...तर आत्महत्या करेन : सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

सहावीच्या भूगोलाच्या मराठी माध्यमांच्या पुस्तकात गुजराती भाषेतील पाने जोडण्यात आली आहेत. ही बाब खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास विष घेऊन या सभागृहातच आत्महत्या करतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील तटकरे यांनी दिला.

नागपूर : सहावीच्या भूगोलाच्या मराठी माध्यमांच्या पुस्तकात गुजराती भाषेतील पाने जोडण्यात आली आहेत. ही बाब खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास विष घेऊन या सभागृहातच आत्महत्या करतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील तटकरे यांनी दिला. तटकरेंच्या या इशाऱ्यानंतर सभागृहात शांतता पसरली आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

सुनील तटकरे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. मराठी माध्यमातील सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेतील पाने कशी समाविष्ट झाली, अशी विचारणा तटकरे यांनी केली. यावेळी त्यांनी पुस्तकच सभागृहात दाखविले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तटकरेंचा हा आरोप फेटाळून लावला. केवळ राजकारण करण्यासाठी तटकरे असे आरोप करीत आहेत. या मुद्यावरून दोनवेळा विधानपरिषदेचे सभागृह स्थगित करावे लागले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर तटकरे यांनी हा मुद्दा लावून धरला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा बचाव करताना तटकरे यांनी गुजराती भाषेतील पाने जोडली आहेत, असा काहीही प्रकार झालेला नाही. केवळ राजकारण करण्यासाठी असे मुद्दे विरोधक उपस्थित करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

Web Title: then I will do Suicide says Sunil Tatkare