'...तरच रोहित पवारांचा होईल पराभव'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ईव्हीएममध्ये गडबड झाली तरच रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा रोहित पवारांचा पराभव कोणीच करू शकत नाही," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे.

पुणे : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. तर त्यांचा विजय निश्चित मानला जात असून, निवडणूक निकालापूर्वीच त्यांच्या विजयाचे फ्लेक्स कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात लावले आहेत. मंत्री राम शिंदे यांचा किमान साठ हजार मतांनी रोहित पवार पराभव करतील असे बोलले जात आहे. मात्र, जर ईव्हीएममध्ये गडबड झाली तरच रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा रोहित पवारांचा पराभव कोणीच करू शकत नाही," असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे.

पुण्यात वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले जाते. यामध्ये काकडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लोकसभा, महापालिका निवडणुकीदरम्यान महायुतीमधील अनेक नेते मंडळी जास्त जागा येतील, अशा घोषणा करतात आणि त्याच्या जवळपास पोहोचतात. त्यामुळे ईव्हीएमबाबत समाजात शंका निर्माण झालेली असून याच पार्श्वभूमीवर काकडे यांनी हा दावा केला आहे.

दरम्यान यंदाच्या निवडणुकीत देखील महायुतीमधील अनेक नेत्यांकडून 240 जागा येतील, असे सांगितलं जात आहे. तसेच, विविध एक्झिट पोलमधूनही युतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अनेकांना उद्या (ता.24) निकालाची उत्सुकता लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Then Rohit pawar loose in election says ankush kakde