...तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन : नारायण राणे

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

''नाणारला एक दगडही रचू देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन''.

- नारायण राणे, खासदार

मुंबई : नाणार प्रकल्पावरून राजकीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनीही यावर भाष्य केले. ''नाणारला एक दगडही रचू देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन'', असा इशाराच नारायण राणेंनी आज (बुधवार) दिला. 

रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत यावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. तसेच नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत धर्मेंद्र प्रधान यांची भेट नाकारली. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करु असे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशासाठी अशी विचारणा करत भेट नाकारली.

त्यानंतर आता नारायण राणेंनीही यावर आक्रमक भूमिका घेत गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. 

Web Title: Then will give Resign of MP Post says Narayan Rane On Nanar Project