आदिवासी जिल्ह्यांत तेरा हजार बालमृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांत 2015-16 या एका वर्षात तब्बल 12 हजार 638 बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, या घटनेला महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दुजोरा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्या चव्हाण, हेमंत टकले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला मुंडे यांनी लेखी उत्तर दिले. 

राज्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होत असताना राज्य सरकारच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याची चिंता चव्हाण आणि टकले यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात 2015-16 मध्ये 21 हजार 985 बालमृत्यू, 17 हजार 944 अर्भक मृत्यू झाल्याची बाब त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणली. मात्र विरोधकाचा दावा पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात फेटाळला. राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांत 2015-16 मध्ये 12 हजार 638 बालमृत्यू झाले असून, त्यापैकी 9 हजार 837 अर्भक मृत्यू असल्याचे मुंडे यांनी नमूद केले. 

ठाणे जिल्ह्यांतील भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्‍यांत एप्रिल ते नोव्हेंबर 2016 या आठ महिन्यांच्या कालावधीत 82 बालमृत्यू झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात दिली. राज्यातील बालमृत्यू साधारणतः कमी वजन, जंतुसंसर्ग व अन्य आजारांमुळे होत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. हे मृत्यू रोखण्यासाठी नियमित लसीकरण, नवजात काळजी कक्ष, स्थिरीकरण कक्ष, जीवनसत्त्वाचा पुरवठा, भरारी पाठकाद्वारे आरोग्य तपासणी आदी उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जात असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. 

Web Title: Thirteen thousand infant tribal districts