राज्यभरात ३८ बळी

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सोमवारी रात्रीपासून पडलेल्या तुफानी पावसाने ३८ जणांचा बळी घेतला.

मुंबई, पुणे, नाशिक  - मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सोमवारी रात्रीपासून पडलेल्या तुफानी पावसाने ३८ जणांचा बळी घेतला. मालाडला झोपड्यांवर भिंत कोसळून २१ जण, तर मालाड सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात मोटार बंद पडून त्यातील दोन जण मरण पावले. मुलुंड येथेही गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून तेथील सुरक्षारक्षक ठार झाला आणि विलेपार्ले येथे एका व्यक्तीचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. कल्याण (जि. ठाणे), आंबेगाव (जि. पुणे) येथेही सीमाभिंत कोसळून अनुक्रमे तीन व सहा जणांना जीव गमवावा लागला, तर नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला.

मुंबई -२५
पाण्याच्या दाबाने कोसळली भिंत 

मालाड टेकडीवरील जलाशय (रिझव्हॉयर) संकुलाची भिंत तेथील आंबेडकरनगर व पिंपरीपाडा येथील झोपड्यांवर कोसळल्याने २१ जण मृत्युमुखी, तर ७८ जखमी झाले. घटना सोमवारी मध्यरात्री १२.४५च्या सुमारास घडली. तसेच मालाड परिसरातच सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. मुलुंड येथेही गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून तेथील सुरक्षारक्षक ठार झाला आणि विलेपार्ले येथे एका व्यक्तीचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. 

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून पाण्याच्या लोंढ्याचा दाब आल्याने मालाडमधील भिंत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही भिंत दोनच वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. ही भिंत कोसळण्यापूर्वी मुसळधार पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये शिरल्याने परिसरातील अनेक रहिवासी जागेच होते. घटनेच्या काही मिनिटे आधी या भिंतीतून आवाज येऊ लागल्याने सावध झालेले काही रहिवासी सुरक्षित ठिकाणी गेले; ज्यांना शक्‍य झाले नाही ते या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. सर्वच रहिवासी गाढ झोपेत असते, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता होती.

गोरेगाव व मालाडच्या मधोमध पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगररांगांच्या कडेला पिंपरीपाडा झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी संपून टेकडी सुरू होते. तेथे १५-२० फूट उंच व एक फूट रुंद, किमान दोन किलोमीटर लांब सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीपलीकडील डोंगरात जलाशय आहे. या डोंगर उतारावरून वेगात आलेले पाणी रस्त्याशेजारील भिंतीशी अडून राहिले. त्या दाबाने भिंतीचा किमान शंभर-सव्वाशे फुटांचा भाग लागूनच असलेल्या झोपड्यांवर कोसळला. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या २०-३० घरांमधील रहिवाशांना बचावाची संधीच मिळाली नाही.

भिंत पडताच तिच्यामागे अडलेला पाच फूट उंच पाण्याचा लोंढा वेगाने या झोपड्यांवरून गेला. त्यात अनेक कच्ची घरे कोलमडून पडली. त्यातील सामान, पाण्याने भरलेली पिंपे, सिलिंडर, कपाटे, शोकेस, दुचाकी इकडे-तिकडे फेकल्या गेल्या. 

भिंतीच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह 
दोन वर्षांपूर्वी येथे तीन टप्प्यांची दगडी भिंत होती, ती चांगली होती. मात्र, ही नवी भिंत कच्ची असल्याचा दावा रहिवाशांनी केला. या भिंतीचा पायादेखील व्यवस्थित नव्हता, अशीही चर्चा तेथे होती. 

भिंतीचा कडकड आवाज येऊ लागल्यावर आम्ही जमेल तितक्‍या लोकांना सावध केले व सगळे भिंतीपासून लांब पळू लागलो. पण, भिंत पडल्यावर जोरदार पाण्याचा लोंढा आला व आम्ही सर्वजण सामानासह इकडेतिकडे फेकले गेलो.
- यशवंत गावणूक, रहिवासी 

सब-वेमध्ये एसयूव्ही बुडाली 
मालाड परिसरात रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात सोमवारी रात्री चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. इरफान खान व गुलशन शेख अशी मृतांची नावे आहेत. रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी बंद पडली. इंजिन बंद पडल्यामुळे आणि पाण्याच्या दाबामुळे गाडीची दारे उघडेनाशी झाली. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांनी कुटुंबीयांना मोबाईलवरून कल्पना दिली. त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, पाऊस वाढल्यामुळे त्यांना गाडीपर्यंत जाणे कठीण झाले होते. अखेर अग्निशामक दलातील जवानांनी दोरी बांधून गाडी पाण्यातून ओढून काढली. इरफान आणि गुलशन यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मालाड दुर्घटनेची चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कारवाई केली जाईल. अत्यंत धोकादायक जागांवर नागरिक राहतात. अवैधरीत्या राहणाऱ्या या मंडळींना हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले होते. आता स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन काही पावले टाकावी लागतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

----------------------------------------------------------------------

कल्याण - ३
शाळेची भिंत ढासळली 

मुसळधार पावसामुळे कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरातील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा बळी गेला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मृतांमध्ये एका लहानग्याचा समावेश आहे. शाळेच्या बाजूने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. भिंतीचा काही भाग शेजारील दोन घरांवर पडल्याने ढिगाऱ्याखाली लोक अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र, यात तिघांचा मृत्यू झाला. शोभा कांबळे (वय ६०), करीना चांद (वय २५), हुसेन महंमद (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. 

अनधिकृत बांधकामे व भूमाफिया
ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे ऐतिहासिक भटाळे तलाव असून, त्यावर मातीचा भर टाकून या ठिकाणी भूमाफियांनी जागा बळकाविल्या आहेत. या परिसरात अनेक अनधिकृत झोपड्या असून, शाळेच्या भोवतीही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्याने डोके वर काढले आहे.

----------------------------------------------------------------------

पुणे - ६
सीमाभिंत झोपड्यांवर

कोंढव्याच्या दुर्घटनेतील मजुरांचे मृतदेह त्यांच्या गावी पोचत नाहीत, तोपर्यंत सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव येथे सीमाभिंत झोपड्यांवर कोसळून सहा मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह चार पुरुषांचा समावेश आहे. स्थानिकांच्या दक्षतेमुळे तिघांचे जीव वाचले. मृत व जखमी कामगार छत्तीसगड व मध्य प्रदेशमधील रहिवासी आहेत. 

आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड पॉलिटेक्‍निकल इन्स्टिट्यूटच्या सीमाभिंतीलगतच सखाराम गणपत कोंढरे यांची १९ गुंठे जागा आहे. त्यापैकी निम्म्या जागेमध्ये बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब दांगट याने पार्किंगसह पाच मजली इमारत उभारली आहे. कोंढरे यांच्या मोकळ्या जागेलगतच सिंहगड महाविद्यालयाची भिंत आहे. याच भिंतीच्या जवळ संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कामगारांना राहण्यासाठी पत्र्याच्या झोपड्या उभारल्या होत्या. त्यामध्ये सात ते आठ झोपड्यांमध्ये १६ कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होते. सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सीमाभिंत झोपड्यांवर कोसळली. भिंतीसमवेत पाच ते सहा मोठमोठी झाडेही झोपड्यांवर उन्मळून पडली. 

विद्यार्थी धावले मदतीला
दुर्घटना घडलेल्या ठिकाणाजवळील दोन इमारतींमध्ये सिंहगड महाविद्यालयाचे विद्यार्थी भाडेतत्त्वावर खोल्या घेऊन राहतात. पावणेबारा वाजता भिंतीसह झाड कोसळल्याचा आलेला मोठा आवाज आणि त्यापाठोपाठ जीव वाचविण्यासाठी मजुरांनी केलेला आक्रोश विद्यार्थ्यांच्या कानावर पडला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तेथे धाव घेतली, तर काही विद्यार्थ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी धावत जाऊन भिंत, माती, पत्रे, व झाडांच्या मोठमोठ्या फांद्यांखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. तीन मजुरांना ढिगाऱ्याखालून कसेबसे बाहेर काढण्यात विद्यार्थ्यांना यश आले. उरलेल्या मजुरांना काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिस, अग्निशामक दल घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी उर्वरित सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. 

सीमाभिंतीचा मालक कोण? 
मजुरांच्या झोपड्यांवर कोसळलेली भिंत ही सिंहगड महाविद्यालयाची असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. मात्र, ही सीमाभिंत बांधकाम प्रकल्प राबविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचीच असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले. पडलेली भिंत सिंहगड महाविद्यालयाची आहे की बांधकाम व्यावसायिकाची, याबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली नव्हती. 

मृत व जखमींची नावे
राधेशाम रामनरेश पटेल (वय २५, रा. नवागड, छत्तीसगड), ममता राधेशाम पटेल (वय २२, रा. नवागड, छत्तीसगड), जेतुलाल पटेल (वय ५०), प्रदेशनिन जेतूलाल पटेल (दोघेही रा. रायपूर), जीतू चंदन रावते (वय २३, रा. पारडी, मध्य प्रदेश), प्रल्हाद चंदन रावते (वय ३०, रा. पारडी, मध्य प्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत, तर विष्णू पुनित पटेल (वय ४२) श्रीनाथ विष्णू पटेल (वय १७), नगमथ विष्णू पटेल (वय ३८, तिघेही रा. ककेडी, जि. मुगेली, छत्तीसगड), दीपक रामलाल ठाकरे (वय २४) अशी जखमींची नावे आहेत. 

----------------------------------------------------------------------

नाशिक- ४
पाण्याची  टाकी फुटली 

सातपूर परिसरातील कार्बन नाका भागातील ध्रुवनगर येथे नव्याने सुरू असलेल्या सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरांसाठी बांधलेली पाण्याची १५ हजार लिटर क्षमतेची टाकी आज सकाळी आठच्या सुमारास फुटली. या टाकीजवळच अंघोळ व कपडे धुण्यासाठी असलेल्या मजुरांच्या अंगावर टाकीचा मलबा पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अब्दुल बारीक (३०, रा. बिहार), बेबी सनबी खातून (२५, रा. पश्‍चिम बंगाल), सुदाम गोहीर (१९, रा. ओडिशा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अनामी धना चंदन (५०, रा. दिल्ली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद मझर अल्लाउद्दीन (३०) याच्यावर जिल्हा रुग्णालयात, तर आणखी काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन उपकेंद्राचा बंब जवानांसह घटनास्थळी दाखल झाला. मुख्य अधिकारी चंद्रकांत भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी बचावकार्य करीत मलब्याखाली दबलेल्या तिघांना जिवंत बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, घटनेनंतर प्रसारमाध्यमांना प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. तर, जिल्हा रुग्णालयातही मृतांच्या नातलगांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव करण्यात आला.

ध्रुवनगर येथे सम्राट ग्रुपकडून सुरू असलेल्या बहुमजली ‘अपना घर’ गृहप्रकल्पाच्या कामासाठी परराज्यांतील बांधकाम मजुरांना आणण्यात आले आहे. त्यांच्यासाठी तेथील नाल्याच्या कडेला महिनाभरापूर्वीच पाण्याच्या दोन टाक्‍या बांधल्या होत्या. दरम्यान, या टाक्‍यांतून होत असलेल्या पाण्याच्या गळतीसंदर्भात काही मजुरांनी सम्राट ग्रुपच्या व्यवस्थापकाकडे तक्रारही केली होती. तसेच, एका दिवसाचे आंदोलनही केले होते.

गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. १) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे पाण्याच्या टाकीखालील माती ढासळत गेली. तसेच, टाकीमध्येही क्षमतेपेक्षा अधिक पाणी आणि गळतीमुळे सकाळी टाकी फुटली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty eight victims in the state