
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे CCTVमध्ये कैद; स्टंप घेऊन आले अन्
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती काल (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास काहींनी जीवघेणा हल्ला केला. संदीप देशपांडे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर चार हल्लेखोरांनी स्टंपने हल्ला केला. या घटनेत संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा तात्काळ शोध सुरू केला.
दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला केलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन आरोपींचे फोटोही समोर आले आहेत. या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. मुंबई पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तब्बल आठ पथकं तैनात करण्यात आली आहेत.
घटनेशी संबंधित असलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती हातात स्टंप घेऊन जाताना दिसून येत आहे. काहींनी मास्क घातलेले दिसत आहे. हे फुटेज हल्ल्यानंतरच असल्याचं सांगितलं जातं आहे. एक आरोपी मध्येच पळतानाही दिसतोय. हल्ल्यानंतर या व्यक्तींनी पळ काढत असतानाचा हा व्हिडिओ आहे. आरोपी हे टॅक्सीमधून आले होते आणि टॅक्सीमधून पळून गेले, असं पोलीस चौकशीमध्ये समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
मनसे नेते संदीप देशपांडे काल (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. रोज त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र शुक्रवारी ते एकटेच असल्याची संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टंप होते. त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. मात्र, हल्लेखोरांना संदीप देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला.
हल्लोखोरांशी झालेल्या झटापटीत संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. हल्ल्यानंतर जखमी देशपांडेंना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेही आले. तर गंभीर इजा नसल्यानं उपचार करुन संदीप देशपांडेंना डिस्चार्ज देण्यात आला. अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आज संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते घटनेसंबधित काही माहिती किंवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.