पुण्यात हजारच्या नोटा कचराकुंडीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यातच डेक्‍कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत कांचन गल्ली येथील कचराकुंडीत महापालिकेच्या कचरावेचक महिलेस चक्‍क हजार रुपयांच्या ५२ नोटा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. 

महापालिकेतील कचरावेचक महिला शांताबाई ओव्हाळ (वय ५६) वाकड येथील काळेवाडी परिसरात बसथांबा क्रमांक १६ येथे राहतात. त्या प्रभात रस्ता परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कचरा गोळा केला. त्यानंतर कांचन गल्लीत त्या ओल्या आणि सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करीत होत्या. त्या वेळी त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीत हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्या नोटा पाहून त्यांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला. त्यांनी हा प्रकार पालिकेचे मुकादम खंडू कसबे यांना सांगितला. त्यांनी डेक्‍कन पोलिस ठाण्यात येऊन हजार रुपयांच्या त्या ५२ नोटा जमा केल्या.

दरम्यान, डेक्‍कन पोलिसांनी बॅंकेत जाऊन त्या नोटांची तपासणी करून घेतली. त्या सर्व नोटा खऱ्या असून, जप्त करण्यात आल्या आहेत. या हजारांच्या नोटा नेमक्‍या कोणाच्या आहेत, याचा तपास करण्यात येत असल्याचे महिला पोलिस उपनिरीक्षक शिल्पा लंबे यांनी सांगितले.

Web Title: thousand notes found in garbage