हजार गावांच्या सुधारणा उपक्रमाला मिळणार गती

मृणालिनी नानिवडेकर
शुक्रवार, 31 मार्च 2017

शेतीचा शाश्‍वत विकास केंद्रबिंदू ; मुख्यमंत्री, अण्णा हजारेंच्या उपस्थितीत प्रारंभ होणार

शेतीचा शाश्‍वत विकास केंद्रबिंदू ; मुख्यमंत्री, अण्णा हजारेंच्या उपस्थितीत प्रारंभ होणार
मुंबई - महाराष्ट्रातील एक हजार गावे कॉर्पोरेट आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नांनी बदलण्याच्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू शेतीचा शाश्‍वत विकास असा असेल. देशाच्या इतिहासात प्रथमच साकार होणाऱ्या या संयुक्‍त उपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिती असेल. दोन ऑक्‍टोबरला उद्योगपती रतन टाटा, अभिनेते अमिताभ बच्चन, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या, पण रखडलेल्या या योजनेला गती मिळणार आहे.

महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या हजार गावांमध्ये आता गावविकासातील तज्ज्ञ कार्यकर्ते मुक्‍कामाला जाणार असून, त्यांच्या प्रशिक्षणास पुण्यात यशदात 2 एप्रिल रोजी प्रारंभ होणार आहे. या बदलाचे सूत्र शेती सुधारणा हेच ठरवण्यात आले आहे. शेती समस्येला मध्यवर्ती मानूनच बदलाचे सूत्र ठरवावे लागणार आहे. व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन कमिशनच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात काम करणाऱ्या तज्ज्ञांना प्रारंभी विकासाच्या संकल्पनेवर निबंध लिहिण्यास सांगण्यात आला होता. त्यातील निवडक मंडळींच्या मुलाखती घेऊन त्यांना दोन वर्षांसाठी सेवेत घेण्यात आले आहे. 1971 पासून शेतीच्या पट्ट्याचे आकारमान 4.28 हेक्‍टरवरून 1.44 हेक्‍टरपर्यंत घरसले आहे, तर कसणाऱ्यांची संख्या 276 टक्‍क्‍यांनी वाढल्याची आकडेवारी या फाउंडेशनने तयार केली आहे. महाराष्ट्रात शेतीचे प्रमाण माणशी उत्पन्न उद्योगाच्या एकसप्तमांश, तर सेवाक्षेत्राच्या एकदशमांश इतके कमी आहे. एक हजार या बदलप्रयोगाची अंमलबजावणी अन्य गावांतही टप्प्याटप्प्याने होईल, असे अतिरिक्‍त मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले. राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, घडवंची अशा बदल झालेल्या गावांना, तसेच स्वदेश फाउंडेशनसारख्या संस्थांना तज्ज्ञ कार्यकर्ते भेट देतील आणि तेथील विकासाचे प्रारूप समजून घेतील.

Web Title: Thousand villages will accelerate the development initiatives