हजारो शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर! कृषी, शिक्षण, आरोग्य विभाग सलाईनवर; बोर्ड परीक्षा सुरळीत पार पडतील

सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शासकीय-निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होतील, असे समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी सांगितले. संपामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य विभागाची पंचाईत होणार आहे.
juni pension yojana
juni pension yojanasakal

सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महापालिका, महसूल, नगरपालिका, आरटीओ कार्यालय, जीएसटी, राज्य विमा कामगार, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषी, जलसंपदा, अशा सर्वच विभागातील तब्बल २५ हजार शासकीय व निमशासकीय कर्मचारी उद्यापासून (मंगळवारी) बेमुदत संपात सहभागी होतील, अशी माहिती शासकीय-निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली. या संपामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य या विभागाची पंचाईत होणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आपापल्या खातेप्रमुखांना संपाची नोटीस दिली. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकराज’मध्ये त्या त्या खातेप्रमुखांना संप मिटेपर्यंत संबंधित कार्यालयाचे कामकाज हाताळाव लागणार आहे. जलसंपदा, कृषी, आरटीओ, जिल्हा परिषद व महसूल यासह बहुतेक विभाग, ज्याच्याशी सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध आहे अशा विभागातील कामाचा खोळंबा होणार आहे. संप किती दिवस चालेल, याचा अंदाज नसल्याने खातेप्रमुखांनी पर्यायी व्यवस्था देखील केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार आता या संपाबाबत काय ठोस भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Summary

बोर्डाच्या परीक्षा सुरळीत पार पडतील

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या बोर्डाची परीक्षा सुरु आहे. शिक्षण विभागासह सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपावर जात आहेत. पण, जिल्ह्यातील सर्वच केंद्र संचालकांनी परीक्षेसंदर्भात काहीच अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा विश्वास माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

महाविद्यालयीन कर्मचारी संपात सहभागी

जुन्या पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी उद्यापासून (मंगळवार) पुकारलेल्या बेमुदत संपात शहर व जिल्ह्यातील उच्च महाविद्यालयातील शिक्षकेतरही सहभागी होतील. सर्व कर्मचारी मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहतील, असे सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सचिव राजेंद्र गिड्डे, कार्याध्यक्ष अण्णा गवळी, खजिनदार राहुल कराडे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर व सिद्धेश्वर स्वामी यांनी कळविले आहे.

विद्यापीठातील कर्मचारी २० मार्चनंतर संपावर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग तीन व चार) सध्या तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारपासून पुकारलेल्या संपात सक्रिय सहभागी होवू शकणार नाहीत. तरीपण, त्यांनी संपाला तुर्तास बाहेरून पाठिंबा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला नोटीस दिली असून ते २० मार्चनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचारी संघटना या बेमुदत संपात सहभागी होतील.

आरोग्य विभाग सलाईनवर

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि राज्य कामगार विमा रुग्णालयातील जवळपास साडेतीन हजार कर्मचारी (वर्ग तीन-चार) मंगळवारपासूनच्या बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे शासकीय-निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी सांगितले. रुग्णसेवा करणारे आरोग्य विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने यंत्रणा कोलमडणार आहे. अधिकाऱ्यांनी त्यासाठी पर्यायी व्यवस्था केली नसल्याची स्थिती आहे.

‘जलसंपदा’चेही कर्मचारी संपात सहभागी

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण व भीम कालवा मंडळातील (जलसंपदा विभाग) बहुतेक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. सध्या कॅनॉल, कालवा, बोगदा व सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडले आहे. अशा स्थितीत पाण्यावर देखरेख ठेवणारे कर्मचारीच संपावर जात असल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. आता कर्मचाऱ्यांची सगळी कामे संप मिटेपर्यंत अधिकाऱ्यांनाच करावी लागणार आहेत.

‘कृषी’चे बहुतेक कर्मचारी आंदोलनात

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच कृषी कार्यालयातील वर्ग तीन व चारचे तब्बल ४५० पेक्षा अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. त्यांनी तशाप्रकारची नोटीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांना दिली आहे. कृषी विभागातील बहुतेक कर्मचारी संपावर जाणार असल्याने कृषी विभागातील शेतकरी हिताच्या योजनांचा बोजवारा उडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com