भुकटीच्या दुधाला तीन रुपये अनुदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील 30 दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे 32 कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

मुंबई - राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील 30 दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे 32 कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुकटीचे दरही कोसळले आहेत. त्याचा परिणाम दूध खरेदी दरावर होऊन संघ शेतकऱ्यांना कमी दर देत आहेत. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात मोफत दूध वाटप आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

31 मार्चअखेर राज्यात 26,506 मेट्रिक टन भुकटीचा साठा शिल्लक आहे. राज्यात महिन्याला सुमारे दहा हजार मेट्रिक टन भुकटी तयार होते. 21 खासगी आणि सात सहकारी दूध संघ दुधापासून भुकटी तयार करतात. सध्या यापैकी 20 संघच प्रत्यक्षात कार्यरत आहेत. भुकटीचे दर पडल्यामुळे दूध खरेदी करून त्यापासून भुकटी बनवण्यासाठी संघांना प्रतिलिटर दुधाला तीन रुपये 24 पैसे इतका तोटा होतो, असे दूध संघांनी राज्य सरकारच्या निदर्शनाला आणले आहे. 100 लिटर दुधापासून साडेआठ किलो भुकटी आणि चार किलो 200 ग्रॅम लोणी तयार होते. त्यामुळे दूध भुकटी बनवताना लागणाऱ्या दुधासाठी प्रतिलिटर तीन रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

त्यासाठी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांना मार्च 2018 या महिन्यात उत्पादित भुकटीपेक्षा 20 टक्के अधिकची दूध भुकटी बनवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील 30 दिवसांसाठी केली जाणार आहे. सध्या दररोज सुमारे 36 लाख लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते. त्यापोटी शासनाकडून सुमारे 32 कोटी रुपयांचे अनुदान संघांना दिले जाणार आहे. महिन्याभरानंतर कृषकाळात दुधाचे अतिरिक्त उत्पादन घटून दूध दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे. 

साडेतीन फॅट्‌सपेक्षा अधिक गुणवत्तेच्या दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे 27 रुपये दर देत नाही तोवर संघर्ष सुरूच ठेवणार. दुधापासून भुकटी करण्यासाठी दिलेले अनुदान अत्यंत तोकडे आहे. 
- अजित नवले, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक 

Web Title: Three rupees Grant for milk powder