दानपेट्या फोडणारे तिघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

रक्कम लांबविल्याची कबुली
सोमनाथ जाधव याने दोन साथीदारांच्या मदतीने विरोबा मंदिर (कांदळी), साईबाबा मंदिर (वारूळवाडी), जगदंबा मंदिर (खोडद), कमलामाता मंदिर (साळवाडी) या जुन्नर तालुक्‍यांतील, तसेच घारगाव (ता. संगमनेर), मंचर (ता. आंबेगाव) येथील मंदिरातील सहा दानपेट्या फोडून रक्कम लांबविल्याची कबुली दिली आहे. जाधव व पथवे यांच्यावर या पूर्वी आळेफाटा, घारगाव व अकोले येथील पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल आहेत.

नारायणगाव - जुन्नर, आंबेगाव व संगमनेर तालुक्‍यात दुचाकीसह मंदिरांच्या दानपेटीतील रकमेच्या चोरीचे १९ गुन्हे दाखल असलेल्या नगर जिल्ह्यातील तीन अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून अकरा दुचाकी नारायणगाव पोलिसांनी जप्त  केल्या आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

या प्रकरणी सोमनाथ सावळेराम जाधव (वय १८, रा. करंदवाडी, ता. संगमनेर, जि. नगर), भोऱ्या ऊर्फ भावड्या वाल्मीक पथवे (वय २२, रा. पांगरी, ता. कोतूळ) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

नारायणगाव पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध पथकातील दीपक साबळे, रामचंद्र शिंदे,  धनंजय पालवे यांनी दुचाकीवरील सोमनाथ जाधव याला ५ मे २०१८ रोजी संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्या जवळील दुचाकी त्याने नारायणगाव येथून चोरल्याची कबुली दिली. गोरड यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. त्या वेळी जाधव याने भावड्या पथवे व एका अल्पवयीन मुलाची मदत घेऊन जुन्नर, आंबेगाव व संगमनेर तालुक्‍यांत दुचाकीसह मंदिरांच्या दानपेटीतील रकमेच्या चोरीचे १९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून अकरा दुचाकी ताब्यात जप्त केल्या आहेत. 

पोलिसांच्या कामाचे कौतुक
गोरड यांनी एक वर्षापूर्वी नारायणगाव पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अठरा गावांत लोकसहभागातून सुमारे अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी मागील सात महिन्यांत चार दुचाकी चोरीच्या टोळ्या जेरबंद करून आरोपींकडून ४४ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच, घरफोडीचे अकरा गुन्हे उघड करून आरोपींना अटक केली आहे. नारायणगाव बसस्थानकातील प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला व गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. गोरड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगिरीचे नारायणगाव ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे. पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी गोरड व त्यांच्या सहकाऱ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला आहे.

Web Title: Three theft arrested in narayangaon