व्याघ्र प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

सचिन जोशी 
सोमवार, 29 जुलै 2019

 जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत तीन पट्टेदार वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. जळगाव वन विभागात वढोदा क्षेत्रात सात-आठ आणि यावल वनक्षेत्रात दोन, असे सुमारे दहा वाघ जिल्ह्यात आहेत.

जळगाव - जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत तीन पट्टेदार वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. जळगाव वन विभागात वढोदा क्षेत्रात सात-आठ आणि यावल वनक्षेत्रात दोन, असे सुमारे दहा वाघ जिल्ह्यात आहेत. एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करून अभियान राबविले जात असताना दहा वाघ असूनही जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा मिळालेला नाही. 

सातपुडा पर्वतराजीने वेढलेल्या जिल्ह्याला मोठी वनसंपदा आहे. सातपुड्याला लागून असलेल्या यावल अभयारण्यातच नव्हे; तर मुक्ताईनगर तालुक्‍यातील वढोदा वनक्षेत्रात दुर्मीळ वन्यजीवांचा अधिवास आहे. 

...तर व्याघ्र पर्यटन विकास
परिणामी, वढोदा व यावल वनक्षेत्राला अभयारण्य अथवा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यास वाघांच्या संवर्धनाचे काम सोपे होऊ शकेल. शिवाय मेळघाट-वढोदा- यावल- आनेर, तोरणमाळ व पुढे शूलपाणेश्‍वर (डांग, गुजरात) या क्षेत्रापर्यंत वाघांना संचारमार्ग उपलब्ध झाल्यास हा संपूर्ण परिसर व्याघ्र पर्यटन म्हणूनही विकसित होऊ शकेल.

शेतीला होणार सौर कुंपण
जळगाव वन विभागांतर्गत वढोदा वनक्षेत्रात ज्या दोनशे एकर शेतजमिनीमुळे त्या जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांसह वाघांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे, त्या जमिनीला सौर कुंपण घालण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ३८ लाख रुपये निधी मंजूर केला असून, त्यामुळे वाघांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger Day special