प्रसंगी रेल्वेने चारा - जानकर
पुणे - दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहेच; स्थिती बिकट असलेल्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यांना प्रसंगी रेल्वेने चारा पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांिगतले.
पुणे - दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहेच; स्थिती बिकट असलेल्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यांना प्रसंगी रेल्वेने चारा पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांिगतले.
येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया २०१९’ स्पर्धेला शनिवारी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जानकर म्हणाले, मराठवाड्यातील दुष्काळ भीषण आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा आहे. वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चारा प्रश्न सोडविण्यासाठीही काही उपाययोजना केल्या जात आहेत. गाळपेरा करणाऱ्यांना मोफत बियाणे आणि खते दिली जात आहेत. औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये चाऱ्याची स्थिती अधिक चिंताजनक आहे. या जिल्ह्यांत चारा कमी पडल्यास रेल्वेने तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चाही झाली आहे.
जनावरांसाठीही टॅंकरचे पाणी
दुष्काळी भागातील जनावरांचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आपली तिजोरी रिकामी करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पशुगणना सध्या सुरू आहे. जनावरांना सात किलो ओला, तर चौदा किलो सुका चारा देण्याचा प्रयत्न आहे. एका गावाला पिण्याच्या पाण्याचे दोन टॅंकर दिले जात असतील तर तेवढेच जनावरांसाठीही द्या, असे आदेश देण्यात आल्याचे जानकर म्हणाले.
युती तर होणारच
निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. युती-आघाड्यांची चर्चा जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जानकर म्हणाले, की कोणाला काहीही बोलू द्या, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष एकत्रितपणे युती करून निवडणुकांना सामोरे जाईल.