विलीनीकरणाविरुद्ध बॅंकांचा आज संप

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने उद्या (ता. 26) एक दिवसाच्या संपाची हाक दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर केंद्र सरकारने विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा यांच्या विलीनीकरणाचा घाट घातला आहे. या निर्णयाला कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध केला असून, युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने बुधवारी संपाची हाक दिली आहे. या संपात दहा लाख कर्मचारी सहभागी होतील, असा दावा संघटनेने केला आहे. बॅंकांचे विलीनीकरण ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. श्रम मंत्रालयाशी अनेकदा चर्चा झाली; मात्र वेतन करारासंदर्भात ठोस निर्णय झाला नसल्याचे ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले.
Web Title: Today the banks strike are against the merger