कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आज पहिली सभा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - उमेदवार निवडीची प्रक्रिया आज पार पडल्यानंतर उद्या (ता. 4) कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद व महापालिका प्रचाराची सुरवात तुळजापूर येथील तुळजा भवानीचे दर्शन घेऊन होणार आहे, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली सभा उद्या मुंबईतील घाटकोपर येथे होत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतल्या या पहिल्या सभेत शरद पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेसने उद्या (ता. 4) उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर येथे दुपारी प्रचारातील शुभारंभाची सभा आयोजित केली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवाजीराव पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पतंगराव कदम यांच्यासह राज्यातले बहुतांश नेते उपस्थित राहणार आहेत.

पवार काय बोलणार?
कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मुंबई महापालिकेत आघाडी व्हावी, अशी शरद पवार यांची इच्छा होती; मात्र कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यामुळे आघाडी झाली नसल्याचा दावा केला जात आहे. त्यातच निरुपम यांनी पवार यांच्याबाबत केलेल्या वक्‍तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले होते. स्वत: शरद पवार यांनी निरुपम हे मुर्ख आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे उद्याच्या सभेत पवार कॉंग्रेससह भाजप व शिवसेनेचा कशाप्रकारे समाचार घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Today the first session of the Congress-NCP