तीन महापालिकांचे आज मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 मे 2017

भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये चुरस

भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये चुरस
मुंबई - भिवंडी-निजामपूर, मालेगाव व पनवेल महापालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तसेच विविध 7 नगर परिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या (ता. 24) मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली आहे.

सहारिया यांनी सांगितले, की या सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महापालिकांच्या एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 026 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्‍यक तितकी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात 2 हजार 291 कंट्रोल युनिट, तर 7 हजार 143 बॅलेट युनिटचा समावेश आहे.

नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान
नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगर परिषदेचे अध्यक्ष व सदस्यपदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. चारही ठिकाणी प्रत्येकी 17 जागा आहेत. एकूण 68 जागांसाठी 276 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 58 हजार 794 मतदार असून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगर परिषद/ या नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील उद्या मतदान होईल, असे ते म्हणाले.

"धारणी'तही तयारी पूर्ण...
धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. एकूण दहा जागांसाठी 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1 लाख 1 हजार 316 मतदारांसाठी 146 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही सहारिया यांनी दिली.

Web Title: today three municipal voting