
एफआरपीची दरवाढ फसवी
सोमेश्वरनगर - केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये (रास्त व उचित दर) प्रतिटन दिडशे रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली. मात्र, ते करताना पायाभूत साखर उतारा दहा टक्क्यांहून सव्वादहा टक्के केला. त्यामुळे प्रत्यक्षात ही वाढ ७६ रुपये प्रतिटन इतकीच होणार आहे. त्यामुळे ही दरवाढ फसवी असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. अशात कारखान्यांचे तोडणी वाहतूक खर्च वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत प्रत्यक्षात अत्यंत किरकोळ वाढ मिळणार आहे.
केंद्र सरकारने सन २०२२-२३ हंगामासाठी उसाच्या एफआरपीपोटी १०.२५ टक्के साखर उताऱ्याला ३०५० रुपये प्रतिटन, तर त्यापुढील प्रत्येक ०.१ टक्के उताऱ्याला प्रतिक्विंटल ३.०५ रुपये इतकी वाढ केली. सरत्या सन २०२१-२२ च्या हंगामासाठी दहा टक्के उताऱ्याला २९०० रुपये दर होता, तर त्यापुढील प्रत्येक ०.१ टक्के उताऱ्याला प्रतिक्विंटल २.९० रुपये वाढ दिली होती. थोडक्यात सन २०२१-२२ मध्ये हंगामात एक टक्के साखर उताऱ्यास २९० रुपये प्रतिटन मिळत होते, ते येत्या हंगामात फक्त २९७ रुपये मिळणार आहेत.
सव्वादहा टक्के उताऱ्यासाठी ३०५० रुपये हा आकडा दिसत असला, तरी पायाभूत उतारा ०.२५ टक्क्यांनी वाढविला आहे. त्यामुळे एक प्रकारे दीडशे रुपयांतील ७४ रुपये सरकारनेच आतल्या हातांनी काढून घेतले आहेत. त्यामुळे दीडशे रुपये दिसणारी वाढ प्रत्यक्षात ७६ रुपये असणार आहे. या एफआरपीच्या निर्णयावर किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी टीका केली.
शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी
पुणे जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के धरल्यास सन २०२१-२२ ची एकूण एफआरपी ३१९० रुपये, तर सन २०२२-२३ ची ३२७८ रुपये प्रतिटन होईल. या हिशेबानेही फक्त टनाला ८८ रुपये वाढत आहेत. एकूण एफआरपीतून ऊसतोडणी वाहतूक खर्च ६५० ते ७०० रुपये वजा केल्यास पुणे जिल्ह्यात सरासरी २६०० इतकी एफआरपी मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर या १२ टक्के साखर उतारा असणाऱ्या जिल्ह्यांसाठी २९०० रुपये राहील. सोलापूर, नगर, नाशिकसह विदर्भ-मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना यापेक्षा कमी दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे.
जादूगाराप्रमाणे ह्या बोटाचं त्या बोटावर करण्याचा हा प्रकार आहे. चुकीच्या पद्धतीने आकडे काढून शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा चालू आहे. एफआरपी उत्पादन खर्चावर आधारित असते. डिझेल, मजुरी, खते, वीज, औषधे असे सगळे खर्च वाढत असताना एफआरपी उत्तरप्रदेशातील एसएपी इतकी साडेतीन हजार रुपये हवी.
- रघुनाथ पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना
मागील वर्षी तुटपुंजी ५० रुपये वाढ दिली होती. यावेळी चांगली वाढ दाखवून उताऱ्यात मारले. अन्य पिके परवडत नाहीत म्हणून ऊस करतात. आता असे दर मिळू लागल्याने ऊसशेतीही परवडणार नाही.
- राजू बनसोडे, ऊस उत्पादक
Web Title: Todays Latest District Marathi News Som22b01218 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..