Measles Disease : राज्यात चार वर्षातील सर्वांत मोठा गोवरचा उद्रेक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Measles Disease
राज्यात चार वर्षातील सर्वांत मोठा गोवरचा उद्रेक!

Measles Disease : राज्यात चार वर्षातील सर्वांत मोठा गोवरचा उद्रेक!

पुणे : राज्यात गेल्या चार वर्षांतील गोवरचा सर्वाधिक उद्रेक यंदा झाला आहे. यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ५०३ रुग्णांना गोवर झाल्याचे निदान झाले आहे. मुंबई, भिवंडी आणि मालेगाव या भागात हे उद्रेक झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
राज्यात गेल्या तीन वर्षांपासून गोवरच्या साथीचे सहा उद्रेक झाला आहेत. गेल्या चार वर्षांमधील यंदाचा सर्वात मोठा उद्रेक आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत झालेल्या उद्रेकात ४३८ रुग्णांना गोवर झाल्याचे निश्चित निदान झाले होते. या वर्षी आतापर्यंत ५०३ रुग्णांचा गोवरचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याचे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

हे लक्षात ठेवा
- गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार
- लसीकरणामुळे टाळता येणारा आजार
- हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो
- ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही प्रमुख लक्षणे
- गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते

आरोग्य खात्याचे आवाहन
लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेलासारख्या सर्व आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येते. मुंबईमध्ये आठ संशयित गोवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी फक्त एका बालकाने गोवरचा एक डोस घेतला आहे. उर्वरित बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेली नाही, असेही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईमध्ये सध्या सुरु असणाऱ्या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेने आपल्या कुटुंबातील नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांची गोवर लस राहिली असल्यास ती तातडीने घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

म्हणून हवे लसीकरण...
- आपल्या परिसरातील मुलांची काळजी घ्यावी यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत
- गोवरमुळे लहान मुलांमधील प्रतिकार शक्ती कमी होणे, अतिसार, न्यूमोनिया अशा गंभीर आजारांचे प्रमुख कारण
- बालके विविध आजार आणि कुपोषणाच्या दुष्टचक्रात सापडतात
- हे लक्षात घेऊन सर्वांनी लसीकरण मोहिमेस सर्वप्रकारे सहकार्य करणे आवश्यक

राज्यातील गोवरचा उद्रेक
वर्ष ........ एकूण उद्रेक ...... संशयित रुग्ण ...... निदान झालेले रुग्ण ..... मृत्यू
२०१९ ...... ३ .................... १३३७ ....................... १५३ ................... ३
२०२० ...... २ .................... २१५० ....................... १९३ ................... ३
२०२१ ...... १ .................... ३६६८ ....................... ९२ ..................... २
२०२२ ...... २६ .................. ६४२१ ....................... ५०३ ................... ८