राज्य मार्गांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

पुणे - राज्य मार्गांवर शंभर किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि अन्य सुविधा असणारे "जनसुविधा केंद्र‘ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागात अठरा स्वच्छतागृहे आणि जनसुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामुळे स्वच्छतागृहांअभावी महिला प्रवाशांची होणारी कुचंबणा थांबणार असून, संबंधित रस्त्यांवरील प्रवासही सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
 

पुणे - राज्य मार्गांवर शंभर किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि अन्य सुविधा असणारे "जनसुविधा केंद्र‘ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागात अठरा स्वच्छतागृहे आणि जनसुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामुळे स्वच्छतागृहांअभावी महिला प्रवाशांची होणारी कुचंबणा थांबणार असून, संबंधित रस्त्यांवरील प्रवासही सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
 

राज्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू असते. परंतु शहरातील बस स्थानक वगळता मार्गावर अन्यत्र महिलांसाठी स्वच्छतागृह मिळत नाही. स्थानकाच्या ठिकाणच्या स्वच्छतागृहांची अवस्थाही समाधानकारक नसते. रस्त्यावर काही ठिकाणी हॉटेल अथवा ढाब्यांवर असलेली स्वच्छतागृहे आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असतीलच असे नाही. या अनुषंगाने राज्य मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह आणि जनसुविधा केंद्रे उभारण्याची कल्पना सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना सुचली. ही कल्पना आता प्रत्यक्ष आकारास येत आहे. त्यानुसार राज्यात दर शंभर किलोमीटर अंतरावर
एक याप्रमाणे राज्य मार्ग व प्रमुख मार्गांवर शंभर स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तब्बल 50
कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वच्छतागृहे आणि जनसुविधा केंद्र उभारण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे यांनी दिली.
 

ते म्हणाले, ‘महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृहासोबतच सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशिनही येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच
प्रवाशांना अल्पदरात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक किंवा दोन रुपयांत एक लिटर पाणी मिळेल अशी व्यवस्था या जनसुविधा केंद्रावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय मोटार दुरुस्ती सेवा, गॅरेज, खासगी कंपन्यांच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या प्रमोशन अथवा विक्रीसाठी दालने देण्याचेही विचाराधीन आहे.‘‘

पुणे विभागात प्रायोगिक तत्त्वावर अठरा ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 6-7 ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह आणि जनसुविधा केंद्रे उभारण्यात येतील, असे धोंडगे यांनी स्पष्ट केले.

रात्रीचा प्रवासही निर्धोक
राज्यात अनेक ठिकाणचे रस्ते रात्री प्रवास करण्यास धोकादायक आहेत. वाहन नादुरुस्त झाले तरी ते दुरुस्त करण्यासाठी जवळपास गाव अथवा गॅरेज मिळत नाही. त्यामुळे अशा रस्त्यांवर रात्रीच्या वेळी प्रवास टाळला जातो. काही रस्त्यांवर चोरी, लूटमारीचेही प्रकारही घडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर लांब पल्ल्याच्या रस्त्यांवर जनसुविधा केंद्रांसारखी सुविधा उपलब्ध झाल्यास त्या रस्त्यावरील रात्रीचा प्रवासही निर्धोक होण्यास मदत होणार आहे. 

Web Title: Toilets for women on State routes