टोलनाक्‍याला "नोटाबंदी'चा स्पीडब्रेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

राज्यात बहुतांशी ठिकाणी वाहनांच्या रांगा; सुट्या पैशांवरून चालकांशी वाद
मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांना 24 दिवसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून टोलचा स्पीडब्रेकर लागला.

राज्यात बहुतांशी ठिकाणी वाहनांच्या रांगा; सुट्या पैशांवरून चालकांशी वाद
मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांना 24 दिवसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून टोलचा स्पीडब्रेकर लागला.

चांद्यापासून बांद्यापर्यंत वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग यासह सर्वच प्रमुख राज्य व राष्ट्रीय महामार्गावर यामुळे चक्काजाम झाला. बरेच दिवस टोलविना सुसाट प्रवास करण्याची सवय लागलेले वाहनचालक त्रस्त झाले. क्रेडिट, डेबिट, ईटीसी टॅग व स्मार्ट कार्डाच्या उपायांची अंमलबजावणी केली, तरी सुट्या पैशांचा गोंधळ कायम राहिला. परिणामी, वाहतूक कोंडी झाली.

नोटाबंदीनंतर वाहतुकीला अडथळा येऊ नये, म्हणून केंद्राबरोबर राज्याने सर्वच नाक्‍यांवर टोलमाफी जाहीर केली. परिस्थितीचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात आली. ती मुदत 2 डिसेंबरला मध्यरात्री संपली. एटीएम व बॅंकांमध्ये दोन हजाराच्या नोटा असल्याने टोल नाक्‍यांवर 35, 60 व 90 रुपयांचे टोल कसे घ्यायचे, हा प्रश्‍न कंपन्यांना पडला. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे, वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबईतील पाचही टोलनाक्‍यांवर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टोल वसुलीचे कंत्राट असलेल्यांना एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीने पॉइंट ऑफ सेल्स (पीओएस) मशिन सर्व नाक्‍यांवर दिल्या आहेत; पण डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने टोल भरण्यास लागणारा वेळ लक्षात घेता वाहनांच्या रांगा काही कमी झाल्या नाहीत. मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू व पाचही ठिकाणांवर ईटीसी (इलेक्‍ट्रॉनिक टोल कलेक्‍शन) टॅगची सुविधा कंपनीने दिली आहे; पण सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ 75 हजार वाहनचालकांकडे ईटीसी टॅग आहे. सुट्या पैशांचा गोंधळ टाळण्यासाठी काही चालकांनी ईटीसी टॅग विकत घेतले. ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरण्यासाठी ई-वॉलेटचा पर्यायही आहे. 15 डिसेंबरपर्यंत टोलनाक्‍यांवर 500च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी असली, तरी बहुतेक ठिकाणी टोल कंपनीने प्रीपेड व्हॅल्यू बेस्ड स्मार्ट कार्ड विकत घेण्याचा आग्रह वाहनचालकांना केला. तरीही कुठलेही स्मार्ट पर्याय नसलेल्या वाहनचालकांबरोबर सुट्या पैशांवरून टोल कर्मचाऱ्यांचा वाद झाला.

आठवडाभरात ई-वॉलेट
आज पेट्रोल पंपावर वेगळेच चित्र होते. मध्यरात्री बंदी लागू होण्याआधीच जुन्या नोटांनी वाहनचालकांनी टाक्‍या फुल करून घेतल्या. त्यामुळे डिझेल व पेट्रोल विक्री मंदावल्यासारखी वाटली. बऱ्याच ठिकाणी ग्राहकांनी डेबिट कार्डचा वापर केला. आठवडाभरात ऑइल कंपन्यांच्या मदतीने देशभरातील पंपांवर ई-वॉलेटचा पर्याय खुला होईल. पेटीएम व अन्य कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे.
- रवी शिंदे, अध्यक्ष, मुंबई पेट्रोल डीलर असोसिएशन

टोलनाक्‍यांवर वाहनांना जास्त वेळ थांबावे लागू नये, यासाठी "पीओएस' मशिन ठेवल्या आहेत. इतर पर्यायही सुरू केले आहेत.
- प्रवक्ता, एमईपी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनी

द्रुतगतीवर पर्यायांमुळे गर्दीची समस्या सुटली
-दिवसभर उर्से, खालापूर टोलनाक्‍यावर वसुली
-प्रारंभी वसुली सुरू होताच वाहनांची गर्दी
-टोल कर्मचाऱ्यांशी चालकांची हुज्जत
-ई-टोल, स्पाइस मशिन, पेटीएम सुविधा
-वायफाय सुरू करण्याचे काम वेगात

नाशिक जिल्ह्यात टोलनाके सुरळीत
-नाक्‍यावर अनुचित घटना नाही; पूर्ववत सुरू
-घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवडला व्यवहार सुरळीत
-नोटांवरून शाब्दिक बाचाबाची

Web Title: tollnaka currency ban