#ToorScam राज्यात डाळ शिजलीच नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड करीत ‘सकाळ’ने शिधावाटप विभागाचा गैरकारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर अवघी ३५ दुकाने तपासून घोटाळा झाला नसल्याचे शिधावाटप विभागाने म्हटले होते; मात्र ‘सकाळ’ने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना तूरडाळ मिळाली अथवा नाही, असे कळवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून तब्बल ९६ टक्के नागरिकांनी त्यांना ही सरकारी तूरडाळ मिळाली नसल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. ज्या काही मोजक्‍या नागरिकांना डाळ मिळाली, तीही ३५ ऐवजी ५५ रुपयांना मिळाली असल्याचे या प्रतिक्रियांवरून  स्पष्ट होत आहे.

नवी मुंबई - तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड करीत ‘सकाळ’ने शिधावाटप विभागाचा गैरकारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर अवघी ३५ दुकाने तपासून घोटाळा झाला नसल्याचे शिधावाटप विभागाने म्हटले होते; मात्र ‘सकाळ’ने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना तूरडाळ मिळाली अथवा नाही, असे कळवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून तब्बल ९६ टक्के नागरिकांनी त्यांना ही सरकारी तूरडाळ मिळाली नसल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. ज्या काही मोजक्‍या नागरिकांना डाळ मिळाली, तीही ३५ ऐवजी ५५ रुपयांना मिळाली असल्याचे या प्रतिक्रियांवरून  स्पष्ट होत आहे. त्यामुळे ‘सकाळ’ने उघडकीस आणलेल्या या घोटाळ्यावर राज्यातील नागरिकांनीच शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबईत भांडुप व मुलुंडशेजारी असणाऱ्या पूर्व द्रूतगती मार्गावर सरकारी तूरडाळीची रिकामी पाकिटे सापडल्यानंतर सतत चार दिवस विविध यंत्रणांकडून माहिती घेऊन तूरडाळ घोटाळ्याचा ‘सकाळ’ने पर्दाफाश केला होता. पायाखालची वाळू सरकलेल्या शिधावाटप विभागाने त्यानंतर थातुरमातुर पथके नेमून भांडुप व मुलुंड भागातील अवघ्या ३५ दुकानांमधील प्रत्येकी १० घरांना प्रत्यक्ष भेटी देत तूरडाळ मिळाली की नाही याची शहानिशा केली. त्यानुसार शिधावाटप विभागाने अनेकांना तूर मिळाल्याचा निष्कर्ष काढून स्वतःची पाठ थोपटून घेतली. याची सत्यता तपासण्यासाठी ‘सकाळ’ने राज्यभरातील नागरिकांना त्यांना तूरडाळ मिळाली की नाही याची माहिती पाठवायला सांगितली होती. त्याला राज्यभरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून अनेकांनी आपल्याला सरकारी तूरडाळ मिळालीच नसल्याचे सांगितले. अनेक नागरिकांनी तसेच रेशन दुकानदारांनीही मागील एक वर्षापासून तूरडाळ मिळाली नसल्याचे सांगितले.

शिधावाटप दुकानांमधून पॉस मशीनवर अंगठा देऊन ऑनलाईन पद्धतीने गहू, तांदूळ खरेदी करणाऱ्यांनाही मिळणाऱ्या पावतीत तूरडाळ खरेदी केली नसतानाही तूरडाळ खरेदी केल्याची छापील पावती मिळत आहे.
- अशोक खेत्रे,  तीर्थपुरी, जालना

ऑनलाईन विक्री करतानाही तूरडाळ मिळत नाही. एक छोटीशी लेखी पावती दिली जाते, त्यावर तूरडाळ नसते; मात्र ऑनलाईन आलेल्या पावतीच्या प्रिंटवर तूरडाळ विक्री केल्याचे छापून येते.
- विकास धुमाळ,  रेशनिंग दुकानदार

Web Title: Toor dal scam issue in maharashtra