#ToorScam तूरडाळीला शिधा विभागातच फुटले पाय! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कळव्यात वर्षभर तूरडाळच नाही 
कळव्यातील रास्त भाव धान्य दुकानात वर्षभरात तूरडाळ आली नसल्याची माहिती तेथील दुकानदारांनी दिली. कळव्यातील मनीषानगरमधील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 280 व दुकान क्रमांक 132 मधील दुकानदारांनीही या माहितीला दुजोरा दिला. 

मुंबई/नवी मुंबई : सरकारी तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा "सकाळ'ने भांडाफोड केल्यानंतर या डाळीच्या काळ्या धंद्यातील वाटा शिधावाटप विभागातून जात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पणन विभागाच्या महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या पथकाने केलेल्या चौकशीत ईस्टर्न फ्री वेवर आढळलेल्या डाळीच्या रिकाम्या पाकिटांची मुळे मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबई परिसरातील शिधावाटप दुकानदार, शिधावाटप विभागातील अधिकारी व दलालांचे धाबे दणाणले आहे. 

सरकारी तूरडाळीची रिकामी पाकिटे जेथे मिळाली, ती जागा "सकाळ'च्या प्रतिनिधींनी "महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन' आणि शिधावाटप विभागाच्या पथकांना दाखवली. त्यानंतर या पथकांनी तेथून ताब्यात घेतलेल्या पाकिटावर नमूद असलेले कंपनीचे नाव व बॅच क्रमांकाच्या आधारे तपास केला असता, त्या डाळीचे शिधावाटप विभागाला वितरण झाल्याचे स्पष्ट झाले. पाकिटांवरील बॅच क्रमांकांवरूनच ती डाळ कोणत्या गोदामांत; तसेच तेथून मुंबईत वितरित झाल्याचेही उघड झाले. या डाळीचे जुलै-ऑगस्ट महिन्यात शिधावाटप विभागाला वितरण झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या पावत्या; तसेच ऑनलाइन माहितीही "मार्केटिंग फेडरेशन'च्या हाती लागली आहे. या डाळीच्या प्रवासाचा चौकशी अहवाल या पथकांनी तयार केला असून, तो सोमवारी (ता. 13) "मार्केटिंग फेडरेशन'च्या व्यवस्थापकीय संचालकांना सादर केला जाणार आहे. मुंबई परिसरातील शिधावाटप दुकानदारांनीच सरकारी डाळीची रिकामी पाकिटे पूर्व द्रुतगती मुक्त मार्गावर फेकली असावीत, असा संशय वर्तवला जात आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार; तसेच त्यांच्याशी संगनमत असलेल्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे. 

कळव्यात वर्षभर तूरडाळच नाही 
कळव्यातील रास्त भाव धान्य दुकानात वर्षभरात तूरडाळ आली नसल्याची माहिती तेथील दुकानदारांनी दिली. कळव्यातील मनीषानगरमधील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 280 व दुकान क्रमांक 132 मधील दुकानदारांनीही या माहितीला दुजोरा दिला. 

Web Title: Toor Scam ration shop toor dal