#ToorScam तूळडाळीची वाट चुकली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - शिधावाटप विभागाने जुलैमध्ये दोन लाख टन तूरडाळीची मागणी केली होती. १९ हजार टन तूरडाळीचे पैसेही पणन विभागाकडे जमा केले होते; मात्र राज्याच्या शिधावाटप विभागाकडे तूरडाळ पोहचलेलीच नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे; मात्र मुंबईच्या वेशीवर सापडलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर ‘उत्पादन तारीख’ गेल्याच महिन्यातील असल्याने तूरडाळीची नेमकी वाट चुकली कुठे, असा प्रश्‍न विचारला जात आहे. ‘सकाळ’ने हा काळाबाजार उघडकीस आणल्यानंतर आज रायगड जिल्हा पुरवठा विभागाने घटनास्थळी काही पाकिटे जप्त करून पंचनामा केला.

नवी मुंबई - शिधावाटप विभागाने जुलैमध्ये दोन लाख टन तूरडाळीची मागणी केली होती. १९ हजार टन तूरडाळीचे पैसेही पणन विभागाकडे जमा केले होते; मात्र राज्याच्या शिधावाटप विभागाकडे तूरडाळ पोहचलेलीच नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे; मात्र मुंबईच्या वेशीवर सापडलेल्या तूरडाळींच्या पाकिटांवर ‘उत्पादन तारीख’ गेल्याच महिन्यातील असल्याने तूरडाळीची नेमकी वाट चुकली कुठे, असा प्रश्‍न विचारला जात आहे. ‘सकाळ’ने हा काळाबाजार उघडकीस आणल्यानंतर आज रायगड जिल्हा पुरवठा विभागाने घटनास्थळी काही पाकिटे जप्त करून पंचनामा केला.

पणन विभागाकडे राज्याच्या शिधावाटप विभागाने सुमारे दोन लाख मेट्रिक टन तूरडाळीची मागणी केली होती, अशी माहिती शिधावाटप विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांनी दिली. असे असतानाही जुलैमध्ये तूरडाळीची रिकामी पाकिटे मुंबईच्या वेशीवर सापडल्याने काळा बाजार होत असल्याचा संशय बळावला आहे. ‘स्वस्त तूरडाळ कोणी पळवली?’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने शनिवारी (ता. ११) बातमी प्रसिद्ध केल्यांनंतर राज्याचे शिधावाटप आणि महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड विभागांमध्ये खळबळ उडाली. झोपेतून जागे झालेल्या या दोन्ही यंत्रणांनी शनिवारी रिकामी पाकिटे सापडलेल्या ठिकाणी धाव घेतली. पूर्व द्रुतगती मुक्त मार्गावर मुलुंड आणि नाहूर परिसरात सेवा रस्त्यालगत झुडपांत टाकलेल्या रिकाम्या पाकिटांची मार्केटिंग फेडरेशनचे पथक, रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी व शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने पाहणी केली; मात्र ते पोहचण्यापूर्वीच पाकिटे गायब झाली होती. काही रिकामी पाकिटे रायगड जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाला सापडली. त्या पाकिटांवरील माहितीची नोंद करून पथकाने पंचनामा केला.

मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापक नितीन यादव यांनीही घटनास्थळी पाकिटांची पाहणी केली. त्यावरील बॅच क्रमांकावरून ही डाळ कोणाकडे गेली आहे, याचा छडा लागेल, असा दावा करत त्यांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतला. दोन्ही पथकांच्या पाहणीनंतर शिधावाटपाच्या भरारी नियंत्रक पथकाचे उपनियंत्रक व उपजिल्हाधिकारी चंद्रकांत थोरात घटनास्थळी पोहचेपर्यंत रायगड जिल्हा पुरवठा पथक पंचनामा करून निघून गेले.

मुंबईत उघडकीस आलेला तूरडाळीचा गैरव्यवहार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर सीआयडी चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी.
- हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री

गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेल्या गैरव्यवहारांना पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

प्रशासन हादरले
तूरडाळीचा काळाबाजार ‘सकाळ’ने उघड केल्यानंतर पणन आणि सार्वजनिक वितरण विभागांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. हादरलेले प्रशासन सुटीच्या दिवशीही कामाला लागले आहे. डाळीच्या रिकाम्या पिशव्यांवरील बॅच क्रमांकाद्वारे ही डाळ मुंबई शहरासाठी वितरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रास्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून ही डाळ काळ्या बाजारात गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

तूरडाळ खरेदी, भरडाई आणि त्याची विक्री यात झालेला गैरव्यवहार दोन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. सरकारला पारदर्शकतेची खरोखरच चाड असेल तर या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Web Title: Toordal Scam issue in maharashtra