पर्यटन विकास कागदावरच! 

पर्यटन विकास कागदावरच! 

मुंबई - मुंबईला पर्यटन केंद्र करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली असली तरी त्याबाबतचा आराखडा आजही कागदावरच आहे. फक्त महापालिकेच्या भायखळ्यातील प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचेच काम सुरू झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर प्राथमिक सुविधाही पर्यटकांना मिळालेल्या नाहीत. पर्यटन विकासाचे धोरण जाहीर झाले असले तरी त्याबाबतची कार्यवाही कासव गतीने सुरू आहे. 

मुंबईत जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे; मात्र फक्त समुद्रकिनारे आणि ब्रिटिशांनी उभारलेल्या वास्तूच्या पलीकडे त्यांना पाहण्यासाठी मुंबईत फार काही नाही. त्यामुळे आता मुंबईच्या पर्यटनाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात फोर्ट-कुलाबा परिसरातील हेरिटेज वॉकसह मुंबईतील बाजार, समुद्रकिनारे, पारंपरिक खाद्यसंस्कृती, लोकलची सफर, पर्यावरण पर्यटन आदी विविध अंगांनी विकास करण्यात येणार आहे. 

मुंबईतील खोताचीवाडी, दादरची पारसी कॉलनी आदी काही वसाहतींचे स्वत:चे वैशिष्ट्य आहे. त्यांचाही पर्यटन आराखड्यात समावेश करण्यात आला होता. पर्यटन विकासासाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून त्यांचा विकास करण्यात येणार होता. प्रत्येक विषयाचे एक सर्किट तयार करण्यात येणार होते. त्यानुसार पर्यटक त्यांच्या आवडीच्या क्षेत्राला भेट देऊ शकतील, असा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, अद्याप फक्त हेरिटेज वॉकच्या दृष्टीने विकास करण्यात आला आहे. 

मुंबईच्या पर्यटनाच्या विकास आराखड्यावर आमचे काम सुरू आहे. हेरिटेज वास्तूंच्या पर्यटन विकासाबाबत आम्ही रस्ते आणि वाहतुकीचा अभ्यास करत आहोत. लवकरच हेरिटेज वास्तूंचा मार्ग अंतिम करण्यात येईल. 
- विजयकुमार गौतम, सचिव, राज्य पर्यटन विकास महामंडळ 

टाइम्स स्क्वेअरच्या धर्तीवर मुंबई स्क्वेअर 
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरच्या धर्तीवर फोर्टमध्ये मुंबई स्क्वेअर तयार करण्यात येणार होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, काळा घोडा, फॅशन स्ट्रीट आणि गेट वे ऑफ इंडियाच्या परिसराचा विकास करण्यात येणार होता. स्ट्रीट कॅफे आणि स्ट्रीट आर्ट शॉपिंग एरियाच्या धर्तीवर त्याचे नियोजन करण्यात येणार होते. 

काय होणार होते? 
- बाजार सर्किट - कुलाबा कॉजवे, फॅशन स्ट्रीट, महात्मा ज्योतिबा फुले मंडई, चोर बाजार, काळबादेवी सोन्याचा बाजार, दादर फूल बाजार, धारावी कुंभारवाडा आणि लेदर मार्केट अशा बाजारांचे सर्किट करण्यात येणार होते. 
- समुद्रकिनारे - शहराच्या समुद्रकिनाऱ्यांवर वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करण्यात येणार होते. 
- धार्मिक सर्किट - मुंबईत विविध धर्मीय पुरातन धार्मिक स्थळे आहेत. त्यांचे सर्किट तयार करण्यात येणार होते. 
- व्हिलेज टूर - मुंबईत कोळी आणि ईस्ट इंडियन समाजाची गावे व गावठाणे आहेत. त्यात त्यांनी आजही पिढ्यान्‌पिढ्या सामाजिक अन्‌ खाद्यसंस्कृती जपली आहे. पर्यटकांना त्यांच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी त्या गावांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार होते. 
- तलाव - मुंबईतील तलावांची दुरवस्था झाली आहे. काही तलावांचे सुशोभीकरण करून तिथे बोटिंगसारखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com