चवीने खाणाऱ्यांसाठी "होम डायनिंग' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मुंबई - राज्यात 20 कोसांवर फक्त भाषाच बदलत नाही तर खाद्य संस्कृतीही बदलते. मुंबई महानगरमध्ये वसलेल्या विविध राज्यांच्या नागरिकांनीही आपल्याबरोबर आपली खाद्य संस्कृती इथे रुजवली आहे. अशा वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचा आस्वाद राज्यात येणाऱ्या पर्यटकांना घेता यावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ होम डायनिंग संकल्पनेचा विस्तार करणार आहे. पर्यटकांना अशा पदार्थांची फक्त चवच चाखता येणार नसून त्याची पाककृतीही मिळणार आहे. 

पर्यटनाचा ट्रेंड बदलतोय. पर्यटकांना हॉटेलिंगपेक्षा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक अस्सल खाद्यपदार्थांची चव घ्यायला जास्त आवडते. शिवाय ते पदार्थ कसे बनतात त्याबद्दलही पर्यटकांना आकर्षण असते. म्हणूनच विविध प्रांतांतील अस्सल खाद्य संस्कृतीचा स्वाद पर्यटकांना घेता यावा म्हणून एमटीडीसी होम डायनिंग संकल्पना राबवत आहे. त्यासाठी राज्यातील 80 घरांची निवड करण्यात आली, अशी माहिती एमटीडीसीचे सचिव विजय कुमार गौतम यांनी दिली. स्वतंत्रपणे होम डायनिंगची संकल्पना राज्यात यापूर्वीपासून सुरू आहे. स्वतंत्र होम डायनिंग व्यावसायिकांना एमटीडीसीच्या व्यासपीठाखाली एकत्र आणले जात आहे. मुंबईमध्ये होम डायनिंगसाठी 20 ते 22 घरांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण, नाशिक, कोल्हापूर, पुणे आदी शहरांमध्ये होम डायनिंगसाठी घरे निवडण्यात आली आहे. सर्व भागातील होम डायनिंगच्या व्यावसायिकांची एमटीडीसीअंतर्गत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. होम डायनिंग संकल्पना पर्यटकांना कशी अधिक आकर्षिक करता येईल, त्याबाबतचे प्रशिक्षण कार्यशाळेत व्यावसायिकांना देण्यात येईल. 

महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचा आस्वाद देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना घेता यावा म्हणून एमटीडीसी होम डायनिंग संकल्पना विकसित करत आहे. पुढील महिन्याभरात सर्व होम डायनिंग व्यावसायिकांची अंतिम यादी करण्यात येणार आहे. ती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर पर्यटकांना उपलब्ध होईल. 
- विजय कुमार गौतम, सचिव, एमटीडीसी. 

Web Title: The tourists will get the taste of Home dining