पारदर्शी कारभाराला जनतेची पसंती - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजपने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जोरदार कामगिरी केली आहे. या कामगिरीचा विजय साजरा करण्यासाठी दादर येथील भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमचा पारदर्शी कारभाराचा विजय झाला आहे. राज्यातील जनतेने आमच्यावर विश्‍वास टाकला आहे. आजचे हे यश जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर दाखवलेला विश्‍वास आहे.

मुंबईत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. मराठी माणसाच्या आशीवार्दानेच शिवसेनेला इतके मोठे यश मिळाले आहे. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर भाजपने यश मिळवले आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. यामागे षड्‌यंत्र आहे, असाही आरोप त्यांनी केला.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

भाजप राज्यात क्रमांक एकचा पक्ष होणार, असे आम्ही निवडणुकीपूर्वीच जाहीर केले होते. तसेच घडले आहे. पारदर्शी कारभाराला जनतेने दिलेली ही पसंती आहे.
- रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

आम्ही योग्य वेळी सुरवात केली आणि शेवटही झकास केला. आम्ही किती पटींनी वाढ केली आहे, याचा विचार आम्हाला हिणवणाऱ्यांनी करावा. हा मुंबईकरांचा विजय आहे.
- आशिष शेलार, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष

मुंबईसह नागपूर आणि ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाला मिळालेले लक्षणीय यश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांचे आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

राज्यातील युतीची सत्ता असल्यामुळे भविष्यात शिवसेना व भाजप एकत्रितपणे काम करतील.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

मुंबई महापालिकेत कोणती भूमिका घ्यायची किंवा राज्यभरातील पक्षाच्या कामगिरीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार हेच निर्णय घेतील.
- सचिन अहिर, मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष

मुंबई महापालिकेत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. मात्र, कुणी विजयी झाला नाही. पक्षाची पुनर्बांधणी करण्यास प्राधान्य देणार.
- रामदास आठवले, रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष

पराभवामुळे कुणी राजीनामा द्यावा अथवा न द्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सत्ता आणि पैशांचा वारेमाप गैरवापर झाला.
- धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

मुंबईत पक्षाचा दारुण पराभव वाटत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली आहे. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही कमी पडलो.
- सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार

Web Title: Transparent administrative public choice