वाहतूकदारांचा उद्या संप; पुण्यातील विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

मालवाहतूकदारांच्या संपात ट्रक, टेंपो आणि बस व्यावसायिक सहभागी होणार आहेत. इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या मालवाहतूकदारांनी उद्यापासून (शुक्रवार) संपाची घोषणा 'ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस' (एआयएमटीसी) यांनी केली आहे.

पुणे : मालवाहतूकदारांनी शुक्रवारी आंदोलन जाहीर केले असले तरी त्यात सहभागी न होता विद्यार्थी वाहतूक सुरळीत ठेवण्याची घोषणा रिक्षा पंचायत आणि पीएमपीएमएलने आज (बुधवार) सायंकाळी केली आहे. तसेच स्कूल व्हॅन असोसिएशननेही संपात सहभागी न होण्याचे ठरविले आहे. मात्र, खासगी व्यावसायिकांकडून शाळांसाठी होणारी वाहतूक काही प्रमाणात बंद राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

मालवाहतूकदारांच्या संपात ट्रक, टेंपो आणि बस व्यावसायिक सहभागी होणार आहेत. इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या मालवाहतूकदारांनी उद्यापासून (शुक्रवार) संपाची घोषणा 'ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस' (एआयएमटीसी) यांनी केली आहे.

यापूर्वी 'ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गुड्‌स व्हेईकल ओनर्स असोसिएशन डिझेल'चे वाढते भाव, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्श्‍युरन्स प्रीमियममध्ये झालेल्या वाढीविरुद्ध 18 जूनला अनिश्‍चित काळासाठी संप पुकारला होता. सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिल्यानंतर चार दिवसांनी हा संप मागे घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा माल वाहतूकदारांनी संपाचा इशारा दिल्याने औद्योगिक, भुसार माल वाहतूक, आयात-निर्यातीवर संपाचा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

देशभरात एकच परमीट असावे, अशी मागणी करीत खासगी प्रवासी वाहतूक संघटनाही या संपात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Transporters will go to Strike on tomorrow Pune student transport will remain continue