राज्यात यंदा 13 कोटी वृक्षलागवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाची आढावा बैठक वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या वेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. 2017 ते 2019 या तीन वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. 2017 मध्ये 4 कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. मागील दोन वर्षांत निश्‍चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षलागवड करण्यात आली आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुणे विभागात 1 ते 31 जुलैदरम्यान 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी 12 हजार 481 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली, तर 2 कोटी 99 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. यासह 1 कोटी 17 लाख खड्डे खोदण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

माहेरची झाडी
"माहेरची साडी' चित्रपटाच्या धर्तीवर "माहेरची झाडी' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रानमळा या गावात लग्न, मुलांचे वाढदिवस अशा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी झाड लावून आनंद साजरा केला जातो. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक गावात "माहेरची झाडी' हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

झाडांवर वॉच ठेवता येणार
लागवडीनंतर वृक्ष जगतात की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जाते. ती दूर व्हावी, यासाठी तुम्ही ज्या जागी वृक्ष लावला आहे त्या वृक्षाची वाढ झाली आहे का, ते जगले आहे का, याची पाहणी दर दोन महिन्यांनी नागरिकांना करता येणार आहे. तशी सुविधादेखील या वर्षीपासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दोन वर्षांत लावलेले वृक्ष जगण्याचे प्रमाण जवळपास 81 टक्के एवढे आहे, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: tree plantation