आदिवासी भागात "ब्लड ऑन कॉल' सुविधा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - पालघर जिल्ह्यात आणि अमरावती व नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्‍यांमध्ये ब्लड ऑन कॉल ही योजना विशेष बाब म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.

मुंबई - पालघर जिल्ह्यात आणि अमरावती व नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्‍यांमध्ये ब्लड ऑन कॉल ही योजना विशेष बाब म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.

दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढीचे उद्‌घाटन करण्यात आले. आदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे गरजेचे असल्याने या योजनेचा आदिवासी भागात मोठा लाभ होणार आहे. गर्भवती माता तसेच प्रसूतीदरम्यान रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील बांधवांना रक्तपिशवी आणण्याकरिता नाशिक, ठाणे, पालघर येथे जायला लागायचे; मात्र आता जव्हार कुटीर रुग्णालयात शासकीय रक्तपेढी सुरू झाल्याने आदिवासी भागातील रुग्णांना रक्तासाठी वणवण फिरण्याची गरज भासणार नाही. ही रक्तपेढी या भागातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आदिवासी आणि दुर्गम भागातील गरज लक्षात घेता विशेष बाब म्हणून अमरावती, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांतील अनुक्रमे धारणी, चुर्णी, डहाणू, जव्हार, धडगाव, अक्कलकुवा येथे ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या रक्त साठवणूक केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार रक्तपुरवठा केला जाईल.

Web Title: Tribal Area Blood On Call Facility Dr. Deepak Sawant