बुलेटट्रेनमुळे आदिवासी भूमिहीन होणार नाहीत : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

हा प्रकल्प शेतकऱ्यांचं नुकसान करणारा असून तो रद्द करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडली होती. यावेळी शिवसेनेच्या नीलम गोर्हे यांनी ही या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचं सांगत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली

नागपुर  : वेगवान दळणवळणाच्या माध्यमातून मागास भागात विकासाची दालने खुली होण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्वाचा आहे, असे सांगत या प्रकल्पामुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.

हा प्रकल्प शेतकऱ्यांचं नुकसान करणारा असून तो रद्द करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडली होती. यावेळी शिवसेनेच्या नीलम गोर्हे यांनी ही या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचं सांगत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमिनी संपादित केल्या जात आहेत, ज्या ठिकाणी विरोध आहे तिथे संवादातून मार्ग काढला जात असल्याचे सांगितले.

या प्रकल्पामुळे वन आणि शेतजमिनीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही असे सांगत हा मार्ग उन्नत असल्यामुळे पुलाच्या खाली गेलेल्या जमिनीचे पूर्ण पैसे शेतकार्याला मिळणार आहेत,या जमिनीवर शेती करण्याची परवानगी शेतकर्यांना मिळणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाची संपूर्ण निर्मिती भारतात होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Tribals will not be landless because bullet train says Chief Minister