Trimbakeshwar Temple Controversy : 'इथून पुढे मंदिराच्या पायऱ्यांवर…'; 'ती' मिरवणूक काढणाऱ्यांचा उद्वेग | Trimbakeshwar Temple News | Trimbakeshwar Controversy | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trimbakeshwar Temple Controversy

Trimbakeshwar Temple Controversy : 'इथून पुढे मंदिराच्या पायऱ्यांवर…'; 'ती' मिरवणूक काढणाऱ्यांचा उद्वेग

Trimbakeshwar Temple Controversy : नाशिक येथील त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला आहे. काही लोकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी बराच गोंधळ सुरु आहे.

या प्रकरणी एसआयटी स्थापन करत प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तसेच मंदिरात बंदी असताना प्रवेश केल्याप्रकरणी चार जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी आज, १७ मे रोजी त्रंबकेश्वर येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दोन्ही समाजाचे नागरिक या सभेत सहभागी झाले. यानंतर दरवर्षी संदल मिरवणूक काढणारे सलीम सय्यद यांनी या सर्व प्रकाराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सय्यद म्हणाले की, आमचं चुकलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला माफ करावं, आम्ही माफी मागतोय. यापुढं आम्ही धूप दाखवणार नाही. ही प्रथा आम्ही बंद करून टाकू. हे माझे वडील करायचे. पण आता जाऊदे, आपल्या गावात भाईचारा आहे.

यामुळे वातावरण चिघळत आहे. गावामध्ये सगळे भाऊबंद आहेत. याच समाजात मी लहानाचा मोठा झालो असून आम्ही एकमेकांच्या घरी अन्न खाल्लेलं आहे. पण कधी काही वाद झाला नाही.

पण आता जाणार नाही….

दरम्यान ग्रामस्थांकडून अशी काही प्रथा नसून, उरुस जातो तेव्हा रस्त्यावरून धूप दाखवली जाते, ते खोटं बोलत आहेत असा दावा करण्यात आला. यावर बोलताना सलीम सय्यद म्हणाले की, आम्ही खोटं तर बोलत नाहीयेत.

हे आधी माझे वडील करायचे ते वारल्यानंतर मी पाहतो. काही नाही फक्त मंदीराच्या मुख्य दरवाज्यातील पहिल्या पायरीवर एक दोन सेकंद उभं राहून उद टाकून आम्ही निघून जातो. पण आता जाणार नाही. असा काही विषय होत असेल तर जाऊद्या.या भागात आपल्याला सुख शांती पाहीजे, असे सलीम सय्यद म्हणाले.

भीती वाटतेच की...

ते पुढे म्हणाले की, असं काही प्रकार झाला की भीती वाटतेच. सध्या वातावरण ढवळून जात आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी जाणार नाही.

पुढच्या वर्षी उरूस मिरवणूक जशी निघते तशीच काढू, पण मंदिरापासून निघून जाऊ. दर्ग्याकडे जाण्याचा तोच मार्ग आहे. मी याच समाजात मोठा झालो आहे. इथे मला एकोपा हवा आहे, बाकी काही नको असेही सलीम सय्यद म्हणाले.

दरम्यान आज मदिरात हिंदु संघटनांकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. तसेच 'हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे' असा नवा फलक देखील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला. जुना फलक अस्पष्ट झाल्यानं हा नवा फलक लावण्यात अल्याचं सांगितलं जात आहे.