
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर प्रकरणात बाहेरच्यांनी पडू नये; राज ठाकरे
नाशिक : ‘‘त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात शंभर वर्षे जुनी असलेली परंपरा मोडीत काढली जाऊ नये, बाहेरच्या लोकांनी यात पडण्याचे कुठलेच कारण नाही. गावातील लोकांनीच त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. या माध्यमातून कोणाला राज्यात दंगली हव्या आहेत का?,’’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. तसेच महाराष्ट्रात मराठी मुसलमानांकडून दंगली होत नाही. वातावरण बिघडू नये, असा इशाराही दिला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी आज बोलताना ते म्हणाले, की त्र्यंबकेश्वरची प्रथा जुनी आहे. परंपरेनुसार धूप दाखविण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्म एवढा कमकुवत नाही, की जेणेकरून कोणी मंदिरात आल्याने तो भ्रष्ट होईल.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशीद व मंदिरे आहेत. तेथे हिंदू व मुस्लिम एकत्र दिसतात. महाराष्ट्रात मराठी मुसलमान राहतात त्या भागात दंगली होत नाही, हा इतिहास आहे. मशिदीवरील भोंग्यांविषयी बोलले पाहिजे, जे दिसते त्यावर बोलले पाहिजे. गड-किल्ल्यांवरील अनधिकृत दर्गादेखील हटविणे गरजेचे आहे.’’
....तर ही वेळ आली नसती
रिझर्व्ह बँकेने काल दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, की हा धरसोडपणा आहे. यापूर्वी देखील मी बोललो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर आज ही वेळ आली नसती. दोन हजार रुपयांच्या नोटा आल्या त्या वेळी एटीएममध्ये देखील जात नव्हत्या. नोट एटीएममध्ये जाईल की नाही, याचा विचारही तेव्हा केला गेला नाही. असले निर्णय देशाला परवडणारे नाहीत. उद्या बँकेत पैसे टाकायचे नंतर नवीन नोट आणणार, असे काही सरकार चालते का? असा सवाल त्यांनी केला.