प्रवासाचा सागरी त्रिकोण

भूमिपूजन प्रसंगी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस.
भूमिपूजन प्रसंगी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस.

भाऊचा धक्का ते मांडवा-नेरूळ रो रो सेवेचे काम सुरू
मुंबई - भाऊचा धक्का ते मांडवा आणि नेरूळ ते मांडवादरम्यान मार्च २०१८ पूर्वी रो रो प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे जलवाहतुकीचे मुंबईकरांचे २० वर्षांपासूनचे स्वप्न साकार होणार आहे. मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वे सेवा, बेस्ट या दळणवळणाच्या सेवांचा सर्वंकष विचार करून त्या परस्परांना जोडण्यात येत आहेत. त्यात आता जलवाहतुकीचाही समावेश करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ७) येथे केले.

भाऊचा धक्का येथे उभारण्यात येणाऱ्या ऑईल जेट्टी, प्रवासी टर्मिनल आणि बंकरिंग टर्मिनलच्या कामाचे भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय भू-पृष्ठ आणि जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की भाऊचा धक्का ते मांडवा आणि मांडवा ते नेरूळ हे अंतर कापण्यासाठी रस्ता मार्गे किमान तीन तास लागतात. रो रो सेवा सुरू झाल्यावर हे अंतर अवघ्या १५ ते १७ मिनिटांत पार करता येणार आहे. रो रो सेवेमुळे फक्त प्रवाशीच नव्हे; तर बस, कार यांचीही वाहतूक केली जाणार असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, इंधनाचीही बचत होईल व प्रदूषणातही घट होईल. या प्रवासात वेळेचीही बचत होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘‘तीन प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळणार आहे. प्रवासी जेट्टी बांधण्यासाठी ६९ प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी बोरिवली, गोराई, विरार आदी नऊ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ’
या वेळी खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी उपस्थित होते.

सर्व वाहतूक सेवा जोडणार
किमान १०० किलोमीटर मेट्रो नेटवर्कच्या कामाचे कार्यादेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपनगरी रेल्वेसेवेने रोज किमान ७० लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो रेल्वे ८० लाख प्रवाशांची वाहतूक करेल. मुंबईतील सर्व वाहतूक सेवांचे एकत्रीकरण करून त्या एकाच तिकिटावर आणण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने केंद्राकडे प्रवासी जेट्टी बांधण्यासाठी ६९ प्रस्ताव पाठवले होते, त्यापैकी नऊ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे; तर उर्वरित ६० प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी मिळेल. मंजुरी मिळालेल्या जेट्टींचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात येईल, अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे काम डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या कामासही दोन महिन्यांत सुरुवात करण्यात येईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.
 

तीन महत्त्वपूर्ण प्रकल्प
जवाहर द्वीप येथे (जेडी ५) ऑईल जेट्टी

देशातील सर्वांत मोठी जेट्टी. इंधनांनी भरलेले टॅंकर्स या जेट्टीवर आणून त्याची चढ-उतार करणे सुलभ होणार आहे. मार्च २०१९ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल.

बंकरिंग टर्मिनल
बंकरिंग टर्मिनल म्हणजे जहाजांना इंधन भरण्याचे ठिकाण. देशातील पहिले टर्मिनल जवाहर द्वीप येथे उभारण्यात येत आहे. येत्या फेब्रुवारीत हा प्रकल्प पूर्ण होईल.

रो रो पॅक्‍स सेवा
मांडवा ते भाऊचा धक्का व मांडवा ते नेरूळ अशा त्रिकोणात रो रो सेवा. नेरूळ ते मांडवा अंतर १७ मिनिटांत; तर भाऊचा धक्का ते मांडवा अंतर १५ मिनिटांत. प्रवाशांबरोबरच बस, कार यांचीही वाहतूक होणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com