विश्वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा
मुख्य सचिवांना मुदतवाढीचे सूतोवाच
. अजोय मेहता दिल्लीच्या वाटेवर
. महत्त्वाचे विभाग पूर्णवेळ मुख्य सचिवाच्या प्रतीक्षेत
. 27 ते 31 जानेवारीदरम्यान फेरबदल
. मंत्रालयाच्या बाहेरील अधिकाऱ्यांना मंत्रालयात रस नाही
मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनात मोठे फेरबदल करतील, असे दिसत आहेत. मंत्रालयासह मुंबई, ठाणे व इतर मोठ्या महापालिकांतील आयुक्तांची खांदेपालट होण्याची शक्यता असून, राज्याच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात 288 पैकी सुमारे 96 विधानसभा मतदारसंघ थेट महापालिका क्षेत्रात येत आहेत. त्यामुळे महसूल, नगरविकास व गृह विभागासह पालिका आयुक्तपदावर कार्यक्षम व मर्जीतल्या अधिकाऱ्यांची वर्णी लावली जाईल, असे मानले जाते. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन हे 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदासाठी ते इच्छुक आहेत. मात्र, सध्या हा बदल शक्य नसल्याने त्यांना तीन-तीन महिन्यांची दोन टप्प्यात मुदतवाढ दिली जाईल, असा दावा सूत्रांनी केला आहे. तर, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता मुख्य सचिव होणार नसतील, तर ते दिल्लीत सचिवपदावर जातील, असे सांगितले जाते.
मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी प्रवीण परदेशी, मनुकुमार श्रीवास्तव, नितीन करीर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, नगरविकास विभाग हा मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विभाग असून, केंद्र व राज्य सरकारच्या शहरी योजना, विकास आराखडे व पायाभूत सुविधांचे प्रकल्पांना गती मिळावी व त्याचा लाभ आगामी निवडणुकांत होईल, अशी कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी देण्यात येईल.
सध्या नितीन करीर व मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्याकडे नगरविकासची जबाबदारी आहे. या दोघांनीही सलग चार वर्षे या विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली असून, त्यांची बदली क्रमप्राप्त असल्याची चर्चा मंत्रालय प्रशासनात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हेदेखील मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी इच्छुक असले, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री त्यांना सोडण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जात आहे.
पूर्णवेळ सचिव मिळणार
गृह विभागासह माहिती जनसंपर्क, कौशल्य विकास, पणन, सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा या विभागांना पूर्णवेळ सचिव नाही. या महत्त्वाच्या विभागांना अतिरिक्त कार्यभार असलेले सचिव आहेत. त्यामुळे या फेरबदलात या विभागांना पूर्ण वेळ सचिव मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता गृह विभागाच्या मुख्य सचिवपदी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची वर्णी लागेल.
मंत्रालयात नको रे बाबा !
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्रालयातील विविध विभागांची जबाबदारी घेण्यास मंत्रालयाच्या बाहेल क्षेत्रीय स्तरावर असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी फारसे इच्छुक नाहीत. मंत्रालयात बदली म्हणजे निवडणुकीत सरकारच्या कामगिरीची जबाबदारी अंगावर घेण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
बदलींचे वारे
. मुख्य सचिवांना मुदतवाढीचे सूतोवाच
. अजोय मेहता दिल्लीच्या वाटेवर
. महत्त्वाचे विभाग पूर्णवेळ मुख्य सचिवाच्या प्रतीक्षेत
. 27 ते 31 जानेवारीदरम्यान फेरबदल
. मंत्रालयाच्या बाहेरील अधिकाऱ्यांना मंत्रालयात रस नाही