राज्य गुप्तवार्ता ऑनलाईन परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाकडून रिक्त जागा भरण्यासाठी 12 जून रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा येथील खामगाव-शेगाव रोडवरील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये घेण्यात आली.

खामगाव : महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाकडून रिक्त जागा भरण्यासाठी 12 जून रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षा येथील खामगाव-शेगाव रोडवरील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये घेण्यात आली. यावेळी ऑनलाईन परीक्षेस बसलेले सुरजसिंह सुपडा गुसिंगे (23) रा. सावरगाव जि.जालना, विलास लक्ष्मण जारवाल (21) रा.सागरवाडी जि.जालना, गोपाल कृष्णा जवंजाळ (27) रा.चिंचपूर जि. सिल्लोड या तिघांनी परीक्षा केंद्रावर मोबाईलद्वारे कॉम्प्युटर स्क्रीनवरील प्रश्‍नपत्रिकेचा ङ्गोटो काढून पेपर फोडण्याचा प्रयत्न करुन शासनाची ङ्गसवणूक केली.

सदर प्रकार परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक संदीप नारायण पायघन (28) नेटवर्क इंजिनिअर आयटीसेल उपविभागीय कार्यालय, खामगाव यांच्या निदर्शनास आला. यावेळी त्यांनी उपरोक्त तिघांचे मोबाईल जप्त करुन तिघांविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

या तक्रारीवरुन पोलिसांनी या तिघांविरुद्ध कलम 420 भादंवि सहकलम 7, 8, 'महाराष्ट्र प्रिव्हेंशन अँड प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट युनिर्व्हसिटी बोर्ड 1982'नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास ठाणेदार हुड करीत आहेत.

Web Title: Trying to leak the state government online paper