'तुकाराम मुंढे ठरणार पिंजऱ्यातील वाघ'

'तुकाराम मुंढे ठरणार पिंजऱ्यातील वाघ'

मुंबई- राज्याच्या प्रशासनाचा बहुचर्चित आणि वादग्रस्त चेहरा म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची थेट मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. परंतु मंत्रालयात बदली केल्यानंतर मात्र, तुकाराम मुंढे एकप्रकारे पिंजऱ्यातील वाघ ठरणार आहेत. एका सनदी अधिकाऱ्याचा असलेला रुबाब तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत पुर्णपणे नाहीसा होणार आहे.

मंत्रालयातील ज्या नियोजन विभागात सहसचिव या पदावर मुंढेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदावरील अधिकाऱ्याला साध्या शिपायाच्या बदलीचेही अधिकार नाहीत. एवढेच नाही तर, घरापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी मोटारीचीही सोय नाही. त्यामुळे मुंढेना बसने किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागणार आहे. सहसचिव हे अकार्यकारी दर्जाचे पद आहे. या पदावरील अधिकाऱ्याला महत्वाचे अधिकार नसतात. त्यामुळे अधिकार नसलेल्या या पदावर काम करताना तुकाराम मुंढे यांना नेहमीच्या रूबाबात वावरता येणार नाही.

मुंढेची नियोजन विभागात सहसचिव या पदावर बदली झाली आहे. विशेष म्हणजे, मंत्रालयात सहसचिव व उपसचिव या पदावर बिगर आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने नियुक्त्या केल्या जातात. कनिष्ठ दर्जाच्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी उपसचिव व सहसचिव पदाच्या आठ-दहा जागा राखीव आहेत. याच राखीव जागेवर मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियोजन विभागात फारसे महत्वाचे काही काम नसते. आलेल्या फाईलींवर आपले मत नमूद करण्याव्यतिरिक्त तुकाराम मुंढे यांना आता कोणतेही काम नसेल. त्या फाईलीसंबंधी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर नियोजन विभागाचे सचिव व मंत्री घेतील.


जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त अशा पदांवरील अधिका-याला त्या यंत्रणेचे सर्व कार्यकारी अधिकार प्राप्त असतात. त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपासून ते संबंधित यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत कुणावरही कारवाईचा दांडपट्टा फिरवता येतो. विविध निर्णय घेता येतात किंवा रद्दही करता येतात. या अधिकारपदामुळे गेल्या अनेक वर्षांत स्वतःचा रुबाब आणि दबदबा तयार करण्यात तुकाराम मुंढे यशस्वी झाले होते. पण आता त्यांना अशी कुठल्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही.

महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निवासासाठी घर असते. तिथे नोकरचाकर असतात. पण अशा सुविधा आता मुंढे यांना मिळणार नाहीत. ते आयएएस अधिकारी असल्याने त्यांना सरकारी निवासस्थान मिळेल. पण ते घर जास्तीत जास्त चार खोल्यांचे असेल. एकुणच, मुंढे हे आता पिंजऱ्यात बंद केलेल्या वाघाप्रमाणे असतील. त्यांना एकूणच हात बांधल्यासारखे रहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com