तुकाराम मुंढे नागपूरचे आयुक्त

tukaram-mundhe
tukaram-mundhe

मुंबई - सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगर-पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे नागपूर मनपात तुकाराम मुंढेंची आयुक्तपदी बदली करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दणका दिल्याचे मानण्यात येते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंढे यांची नवी मुंबई आणि नाशिक महापालिकांत नियुक्ती केली होती. नवी मुंबईत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी चांगलेच हैराण केले होते. मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. आता नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. याआधी या पदावर अभिजित बांगर काम करत होते.

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. महाविकास आघाडीचे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी नागपूरचा गड असलेल्या पालिकेत तुकाराम मुंढेंची बदली केली आहे. मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येत्या काळात ही बाब भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे.

येत्या दोन वर्षांत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या मनपात तुकाराम मुंढेंना मुद्दाम आणलं का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

इतर बदल्या
मुंबई शहर जिल्हाधिकारी या पदावर मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव राजीव निवतकर यांची नियुक्ती झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र आरंभले आहे. याआधी १६ जानेवारीला ठाकरे यांनी २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे यांनी आणखी बदल्या करून प्रशासनात खांदेपालट केला आहे.

अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे - अरविंद कुमार (अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास आणि जलसंधारण), दिनेश वाघमारे (अध्यक्ष, महापारेषण), पराग जैन (सचिव, सामाजिक न्याय), राजीव जाधव (सचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय), प्रजक्ता वर्मा (सचिव, मराठी भाषा विभाग), शेखर गायकवाड (आयुक्त, पुणे महापालिका), ए. एम. कवाडे (आयुक्त, सहकार आणि नोंदणी), सौरभ राव (साखर आयुक्त), एस. एस. डुंबरे (महासंचालक, मेडा पुणे), ओमप्रकाश देशमुख (नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक, पुणे), शिवाजी जोंधळे (सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय), कांतिलाल उमाप (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क), आनंद रायते (अतिरिक्त आयुक्त भूमी अभिलेख पुणे), संपदा मेहता (सहआयुक्त विक्रीकर, मुंबई), आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे), यू. ए. जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला), किरण पाटील (उपसचिव, मुख्य सचिव कार्यालय).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com