पणनमंत्र्यांच्या जिल्ह्यात तूर खरेदीचा बट्ट्याबोळ 

पणनमंत्र्यांच्या जिल्ह्यात तूर खरेदीचा बट्ट्याबोळ 

सोलापूर - राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग खाते सांभाळणाऱ्या सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात तूर खरेदीचा बट्ट्याबोळ उडाला आहे. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी बारदानाच मिळत नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील सातही तूर खरेदी केंद्र बंद आहेत. एकीकडे तूर खरेदी बंद अन्‌ दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सुलतानी आणि अस्मानी संकटात सापडला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात नाफेड व एफसीआयच्या वतीने सात ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या सात केंद्रांवरून आतापर्यंत 1 लाख 53 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. नाफेडच्या वतीने जिल्ह्यात बार्शी, मंगळवेढा, अकलूज, कुर्डुवाडी या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तर एफसीआयच्या वतीने सोलापूर, अक्कलकोट व दुधनी या ठिकाणी तीन अशी सात केंद्रे सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातून आणखी एक लाख क्विंटलच्या आसपास तुरीची आवक होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी पडत असली तरीही नवीन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यास नाफेड मान्यता देत नाही. मंजूर असलेल्या केंद्रावर बारदानाच नसल्याने तूर खरेदी होऊ शकत नाही. 

मागणी दीड लाखाची मिळाला 24 हजार 
तूर खरेदीसाठी नाफेडच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाकडे दीड लाख बारदाना आवश्‍यक असल्याचे कळविण्यात आले होते. पाच दिवस खरेदी बंद राहिल्यानंतर आता सोलापूरसाठी फक्त 24 हजार बारदाना देण्यात आला आहे. हा बारदाना चारही केंद्राला वाटप करण्यात आला असून, पुन्हा बारदानाअभावी खरेदी बंद पडण्याची शक्‍यता आहे. बारदाना खरेदीची प्रक्रिया एफसीआय स्वतः राबवत असूनही अद्यापपर्यंत एफसीआयच्या केंद्रासाठी बारदाना उपलब्ध झालेला नाही. 

बारदानाअभावी कोठेही तूर खरेदी बंद नाही. 15 एप्रिलपर्यंत दहा लाख क्विंटल खरेदीची अपेक्षा होती. फेब्रुवारीमध्ये 17 लाख क्विंटल खरेदी झाली होती. आतापर्यंत तीस लाख क्विंटल तूर खरेदी झाली आहे. बारदान्याचा देशभरात तुटवडा आहे. बारदानाशिवाय येणाऱ्या तूर खरेदीत येणारे अडथळे दूरकरण्यासाठी दररोज आढावा बैठका सुरू आहेत. 
- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com