राज्यात सहा महिन्यांत १२ वाघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत १२ वाघांचा मृत्यू झाला.

नागपूर - वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत १२ वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाच, अमरावती तीन तर नागपुरात दोन वाघ दगावले. यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला. त्यातील सहा वाघांची शिकार झाल्याचे उघडकीस आल्याने वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  

महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे होणारे मृत्यू चिंता वाढविणारे आहेत. सहा दिवसांपूर्वी चिमूरजवळील मोटोपार शिवारात कुत्र्यासाठी टाकलेले विष खाल्ल्याने तीन वाघ दगावले. त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे. वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आलेली आहे. काही गावांत शोधमोहीम राबविण्यात आली. देशभरात आतापर्यंत ५४ वाघ दगावले. त्यात मध्य प्रदेशात सर्वाधिक १५ तर महाराष्ट्र १२ वाघ गमावून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve tigers die in six months in the state