निवडणुकीची पैज अंगलट; मिरज तालुक्‍यात दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यावरील प्रेम त्यांच्या दोन कट्टर समर्थकांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

मिरज : लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यावरील प्रेम त्यांच्या दोन कट्टर समर्थकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या दोघांपैकी निवडणूक कोण जिंकणार, यावर मिरज तालुक्‍यातील दोघांनी एक लाखाची पैज लावली होती. नुसती पैजच लावली, नाही तर त्या देय पैशाचा बॉंड केला.

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून आज त्यांना अटक केली. राजकुमार लहू कोरे (विजयनगर, म्हैसाळ) आणि रणजित लालासाहेब देसाई (शिपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली. 

सांगली मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले. भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील, स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यात कोण पुढे राहील, कुणाला किती मते मिळतील, याचा अंदाज व्यक्त करण्यात सारे व्यग्र आहेत. अगदी चहापासून जेवणापर्यंतच्या पैजा लागल्या आहेत. या साऱ्या तोंडी आहेत. मिरज तालुक्‍यातील राजकुमार आणि रणजित यांनी मात्र गांभीर्याने पैज लावली. तीही एक लाख रुपयांची. ती नोटरीकडे नोंद केली. त्याचा गाजावाजा झाला आणि तेच या दोघांच्या अंगलट आले. मिरज शहरात जुगाराशी संबंधित काहींनी ही पैज लावण्यात पुढाकार घेतला होता. या करारामध्ये संजय पाटील विजयी झाले, तर रणजित देसाई यांनी राजकुमार कोरे यांना एक लाख द्यायचे आहेत.

स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील विजयी झाले, तर कोरे यांनी देसाई यांना एक लाख द्यायचे आहेत, असे नमूद केले आहे. याबाबत सोशल मीडियावर याची खूपच चर्चा झाली. पैजेच्या बॉंडची छायाचित्रे व्हायरल झाली. निवडणुकीचा ताण संपताच मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested in Miraj for Betting