धुळे जिल्ह्यात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सफाई कर्मचाऱ्याला रोखल्याने, तर शिरपूर येथे पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेले भानुदास देवचंद भवरे हे आज दुपारी बारानंतर महापालिकेत आले.

धुळे/ शिरपूर : वारंवार मागणी करूनही कालबद्ध पदोन्नतीचा फरक मिळत नसल्याने धुळे महापालिकेच्या निवृत्त सफाई कर्मचाऱ्याने आज उपायुक्तांच्या दालनातच अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर शिरपूर येथे पाटचारीसाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा आणि पाटातून पाणी सोडावे, या मागणीसाठी मांजरोद (ता. शिरपूर) येथील शेतकऱ्याने महाराष्ट्रदिनी पाटबंधारे कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सफाई कर्मचाऱ्याला रोखल्याने, तर शिरपूर येथे पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेले भानुदास देवचंद भवरे हे आज दुपारी बारानंतर महापालिकेत आले. त्यांनी उपायुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात प्रवेश केला. त्या वेळी भवरे यांनी गळ्यातील दोन व हातात एक, अशा तीन बाटल्यांमधील पेट्रोल अंगावर ओतले.

या प्रकाराने उपायुक्त जाधव व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही सुचेनासे झाले. तोवर भवरे यांनी आगपेटी हातात घेतली. प्रसंगावधान राखून इतर उपस्थितांनी भवरे यांना रोखले. कालबद्ध पदोन्नतीचा फरक देण्याची भवरे यांची मागणी आहे. याप्रश्‍नी उचित कार्यवाही सुरू असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. 

शिरपूरला शेतकरी ताब्यात 

पाटचारीसाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा व पाटातून पाणी सोडावे, अशा मागण्यांसाठी शेतकरी रितेश सुनील पाटील यांनी महाराष्ट्रदिनी सकाळी शिरपूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकरी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेत पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लगेचच पाटचारीत पाणी सोडण्याचा आदेश झाला.  

 
 

Web Title: Two attempted suicide in Dhule