Nana Patole : विशेष अधिवेशन न बोलविल्यास आंदोलन : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two-day special session with Congress delegation meeting with Governor Ramesh Bais regarding state development nana patole

Nana Patole : विशेष अधिवेशन न बोलविल्यास आंदोलन : नाना पटोले

मुंबई : राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती केली. राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील, अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

पटोले म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत तत्काळ मिळावी, बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिक लोकांवर पोलिस अत्याचार करत आहेत. खारघरमध्ये सरकारच्या ढिसाळ नियोजनाने १४ लोकांचे बळी गेले, त्याप्रकरणात अद्याप कारवाई केली जात नाही या व राज्यातील इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे.

मुंबईचे महत्व घटविण्याचा प्रयत्न

मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील सरकार सातत्याने करत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचे हे महत्व भाजपाच्या डोळ्यात खुपत आहे. मुंबईतील महत्वाची कार्यालये गुजरातला हलवून मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी केला.