नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

भडाणे (ता. बागलाण) येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय 44) यांनी कांदा चाळीत गळफास घेऊन, तर सारदे येथील मनोज रामराव धोंडगे (वय 33) यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. खैरनार यांच्या नावे 2.10 हेक्‍टर शेती आहे. त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेने त्यांनी चाळीत तब्बल पाचशे क्विंटल कांदा साठवला होता. मात्र, कांद्याला अवघे शंभर ते दीडशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने त्यांनी अनेक वेळा बाजार समितीत फेरफटका मारला. परंतु भाव कोसळल्याने ते हताश होऊन त्यांनी गुरुवारी (ता. 6) कांदा चाळीतच गळफास घेतला. कांदा उत्पादक शेतकऱ्याची ही राज्यातील बहुधा पहिलीच आत्महत्या असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. 

दुसऱ्या घटनेत सारदे येथील मनोज धोंडगे यांनी शुक्रवारी (ता. 7) शेतात विषप्राशन केले. त्यांना नातेवाइकांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालय दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांनी शेततळे करून डाळिंब व कांद्याची लागवड केली होती. त्यांच्यावर एकवीस लाखांचे कर्ज होते. पिकांना भाव नसल्याने हा बोजा कमी कसा करावा या विवंचनेत ते होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यांच्या मागे एक सहा वर्षांची मुलगी व आई-वडील असा परिवार आहे.  

Web Title: Two farmers suicides in Nashik district