चिऊताईला वाचवण्यासाठी... वन विभाग ठाणे, पुण्यात दोन हजार घरटी बांधणार 

नेत्वा धुरी
सोमवार, 20 मार्च 2017

चिमण्यांचा चिवचिवाट टिकवण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी काही संस्थांच्या सहकार्याने कृत्रिम घरटी बांधणार आहोत. 
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री 

मुंबई - वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने चिमण्यांचा चिवटिवाट टिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जीवसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चिऊताईचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेचर फॉरेव्हर सोसायटी व इला फाऊंडेशन यांच्या सहकार्याने वन विभाग ठाणे, तसेच पुणे जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण भागांत दोन हजार कृत्रिम घरटी बांधणार आहे. त्यासाठी किमान साडेपाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील इमारतींच्या गच्च्यांवरही पुढील वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 

वन खात्याच्या पुणे विभागाने पुण्यातील सासवड येथे 2013 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर चिमण्यांसाठी दीडशे घरटी बांधली होती. त्यापैकी 140 घरट्यांत चिमण्यांनी वास्तव्य केले, कित्येक घरट्यांत चिमण्यांची अंडीही आढळली होती. या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर राज्यभरात हा उपक्रम राबवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. 

ठाणे जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण भागांत एक हजार घरटी बांधली जातील. ही घरटी प्रामुख्याने मुरबाड आणि अलिबाग परिसरात असतील. 

विकसकांकडून सकारात्मक प्रतिसाद 
इमारतींच्या गच्च्यांवर चिमण्यांसाठी घरटी बांधण्याबाबत अनेक विकसकांशी चर्चा झाली आहे. त्यापैकी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती ठाणे वन विभागाचे (प्रादेशिक) मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. 

चिमण्यांना वाचवण्यासाठी... 
- अंगणात, गॅलरीत पिण्यासाठी पाणी आणि धान्य ठेवा. 
- कृत्रिम घरटी बांधा. 
- ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करा. 

चिमण्यांचा चिवचिवाट टिकवण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी काही संस्थांच्या सहकार्याने कृत्रिम घरटी बांधणार आहोत. 
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री 

Web Title: Two thousand nests Build in pune thane