राष्ट्रवादीच्या विरोधात उदयनराजेंची महायुती? 

udayanraje
udayanraje

सातारा - राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता शांत राहिलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी वेगळ्या रणनीतीचा अवलंब करत आता महायुतीच्या झेंड्याखाली सर्वांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या महायुतीत कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचे दोन्ही गट, शेतकरी संघटना यांची सातारा विकास आघाडीशी मोट बांधली जात असून, दोन-चार दिवसांत याची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सातारा विकास आघाडीतील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. सध्या तरी सातारा तालुक्‍यापुरती ही सर्वपक्षीय युती असली तरी लवकरच जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विरोधात ही महायुती घडविण्याचे उदयनराजेंचे प्रयत्न सुरू आहेत. 

पालिका निवडणुकीपासून खासदार उदयनराजेंनी थोडी "हटके' भूमिका घेत मिळविलेल्या यशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सातारा पालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर खासदारांनी आता जिल्हा परिषदेच्या सत्तेत बारामतीकरांचा हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी व जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याची तयारी केली आहे. अजिंक्‍यतारा कारखान्यावरील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदारांविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून काही तरी प्रतिउत्तर येईल, अशी सर्वांनाच उत्सुकता होती. पण, उदयनराजे शांत राहिले. त्यांच्या शांत राहण्यामागे नेमके काय, अशी शंकाही कोणाला आली नाही. उलट अनेकांनी ते भाजपच्या वाटेवर आहेत, त्यांच्यासाठी भाजपकडून पायघड्या घातल्या जाणार आहेत, अशीच चर्चा रंगली. पण, प्रत्यक्षात पडद्याआड वेगळेच घडत होते. उदयनराजे बोलतात त्यापेक्षा शांत राहतात त्यावेळी अधिक आक्रमक निर्णय घेतात. हे या पडद्यामागील घडामोडींनी उघड केले आहे. गेल्या आठवडाभरात खासदार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सातारा विकास आघाडीसोबत भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचे दोन्ही गट, शेतकरी संघटना, रासप यांची मोट बांधण्यात यशस्वी झाले आहेत. या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून त्यांनी सातारा तालुक्‍यासाठी सातारा विकास आघाडीसोबत या सर्वांची महायुती तयार केली आहे. या महायुतीची घोषणा ते येत्या दोन-चार दिवसांत करणार आहेत. सुरवातीला त्यांनी सातारा तालुक्‍यातील दहा गट व वीस गणांसाठीची रणनीती या महायुतीच्या माध्यमातून निश्‍चित केली आहे. आता त्यांची वाटचाल जिल्ह्यासाठी ही महायुती बनविण्याकडे सुरू झाली आहे. त्यासाठी ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते तसेच रिपब्लिकन पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांशीही चर्चा झाली आहे. सुरवातीला सातारा तालुक्‍यातील दहा गट आणि 20 गणांची या महायुतीतील मित्रपक्षांत वाटणीही त्यांनी केली आहे. लवकरच येथील उमेदवार ते निश्‍चित करणार आहेत. राजधानी जिल्हा विकास आघाडी या माध्यमातून जिल्ह्यात या मित्रपक्षांशी ते महायुती करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना आतापर्यंत कॉंग्रेस व भाजपची साथ मिळाली आहे. तसेच शेतकरी संघटना व रिपब्लिकन पक्षही त्यांच्या सोबत राहणार असल्याचे खासदार समर्थकांतून सांगण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीला शह 
उदयनराजेंच्या या महायुतीच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला "यू टर्न' मिळाला आहे. आता राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय एकत्र करण्याचे काम उदयनराजेंनी केले आहे. ही महायुती जिल्ह्यात पोचवून ती राष्ट्रवादी विरोधात या निवडणुकीत यशस्वी करण्यात उदयनराजे यशस्वी होणार का, याचीच आता उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com