आमच्या घराण्यात विश्‍वासघात करण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा शरद पवारांवर थेट वार I Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale vs Sharad Pawar

Maharashtra Politics : आमच्या घराण्यात विश्‍वासघात करण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा शरद पवारांवर थेट वार

सातारा : ते वयाने मोठे असून, विचारानेही मोठे आहेत. त्यामुळे सातारा लोकसभेच्या मागील निवडणुकीतील निकालाबाबत ते म्हणाले, ते योग्य आहे; पण मी आणि आमच्या घराण्यात विश्‍वासघात करण्याची परंपरा नाही. निवडणुकीत कोण काय करते, काय नाही, हा भाग वेगळा आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला.

आमच्या जाहीरनाम्यात होते ते सर्व पूर्ण केले आहे; पण इतके वर्षे तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी का कामे झाले नाहीत. दुसऱ्याला नावे ठेवण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही; पण त्यांच्या नावे ठेवण्यामुळे आम्हाला दृष्ट लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेची खिल्ली उडवली.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) मित्र समूहाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी जलमंदिर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याबाबत खासदार उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, ‘मी राजीनामा दिला; पण मागे घेतला नाही. त्यांनी दिला आणि मागे घेतला, का ते त्यांनाच विचारा. शेवटी ते वयाने मोठे आहेत. विचारांच्या बाबतीत म्हणाल, तर त्यांचे वाचन मोठे आहे. ते म्हणाले, ते योग्यच आहे; पण मी व आमच्या घराण्याला विश्‍वासघात करण्याची आमची परंपरा नाही. त्यामुळे शेवटी एखाद्या निवडणुकीत कोण काय करते, काय करत नाही, हा भाग वेगळा आहे.’

कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. यावर उदयनराजे म्हणाले, ‘एका राज्यात जे घडले. त्याचा परिणाम दुसऱ्या राज्यात घडेल असे नाही. महाराष्ट्रात निवडणूक लागल्यावर बघू.’ शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेवर ते म्हणाले, ‘या प्रश्‍नाला उत्तर देणे मला योग्य वाटत नाही. कारण नारळ फोडी गॅंग असे ते आम्हाला म्हणतात; पण नारळ फोडत नसतात तो वाढविला जातो, हे त्यांनी समजून घ्यावे. मला त्यांचे नावही घ्यायचे नाही. आमच्या जाहीरनाम्यात होते ते सर्व पूर्ण केले आहे.'

इतके वर्षे तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी का कामे झाले नाहीत? उलट आमच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आली की सर्व कामे झाली. दुसऱ्याला नावे ठेवण्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही; पण त्यांच्या नावे ठेवण्यामुळे आम्हाला दृष्ट लागणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आमदार शिवेंद्रसिंहराजेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले, ‘याबाबत मला माहिती नाही, माझी त्यांच्या मंत्रिपदाला आडकाठी नाही.’

लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू असून, तुमच्या विरोधात रामराजेंची उमेदवारी असेल तर तुम्हाला आव्हान वाटेल काय, या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, ‘लोकशाही आहे, कोणी कुठूनही उभे राहू शकते. प्रत्येकाला अधिकार आहे. अजून लोकसभा निवडणूक लांब आहे. ज्या त्यावेळी कोण विरोधात आहे, त्यावर ठरवू.’