काल सवतासुभा...आज पक्षाच्या बैठकीत! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सातारा - राजधानी जिल्हा विकास आघाडीची स्थापना करण्याची घोषणा करून काल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सवतासुभा मांडणारे खासदार उदयनराजे आज पुण्यात खासदार शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला 15 मिनिटे उपस्थित राहिले. त्यांच्या या उपस्थितीने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजे पक्षासोबत राहणार, की विकास आघाडी पुढे चालविणार, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

सातारा - राजधानी जिल्हा विकास आघाडीची स्थापना करण्याची घोषणा करून काल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सवतासुभा मांडणारे खासदार उदयनराजे आज पुण्यात खासदार शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला 15 मिनिटे उपस्थित राहिले. त्यांच्या या उपस्थितीने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजे पक्षासोबत राहणार, की विकास आघाडी पुढे चालविणार, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षनिहाय हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस सोबतच भाजपनेही तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पक्षाकडे दुर्लक्ष करीत राजधानी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी काल कल्याण रिसॉर्टमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा घेऊन तशी घोषणा केली. कार्यकर्त्यांना गट, गणनिहाय उमेदवार निश्‍चित करण्याचीही सूचना केली. नेमक्‍या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाचे सर्व आमदार व खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली होती. उदयनराजेंनी काल मांडलेला सवतासुभा लक्षात घेता ते आज पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. शिवाय बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खासदारांच्या या भूमिकेविषयी तक्रारी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, पुण्यातील बैठकीत नोटाबंदी व सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल आणि त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी राज्यस्तरावर आंदोलन करण्याची भूमिका याविषयी शरद पवार यांनी भूमिका मांडली. तसेच या बैठकीत पक्षाचे राजस्तरावरील नेते मंडळींनीच भूमिका मांडल्याने स्थानिक व जिल्हास्तरावरील नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे तक्रारीचा पाढा जिल्ह्यातील नेत्यांना वाचता आला नाही. 

उदयनराजेंनी या बैठकीला केवळ 15 मिनिटांची उपस्थिती लावली. या उपस्थितीने जिल्ह्यातील आमदारांच्या भुवया उंचावल्या. कालपर्यंत सवतासुभा मांडणारे खासदार चक्क पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने आमदारही आवाक्‌ झाले. उदयनराजे नेमके पक्षासोबत राहणार, की जिल्हा विकास आघाडीच पुढे चालविणार, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

शिवेंद्रसिंहराजेंची अनुपस्थिती 
पुण्यातील बैठकीस खासदार उदयनराजे 15 मिनिटे उपस्थित राहिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बैठकीला उपस्थित नव्हते. आमदारांच्या गैरहजेरीबाबत अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

Web Title: udayanraje bhosale meet sharad pawar