उद्धव यांच्याकडून राज ठाकरे बेदखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्येच प्रमुख लढाई होणार असल्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत दिले. मनसे आणि राज ठाकरे यांचा एका शब्दानेही उच्चार न करता उद्धव यांनी त्यांना बेदखल केले. 

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्येच प्रमुख लढाई होणार असल्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत दिले. मनसे आणि राज ठाकरे यांचा एका शब्दानेही उच्चार न करता उद्धव यांनी त्यांना बेदखल केले. 

मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा झंझावात सुरू झाला असून, उद्धव ठाकरे यांची पहिलीच प्रचारसभा गिरगावात पार पडली. या सभेत उद्धव यांनी फक्‍त भाजपला लक्ष्य केले. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपने रणनीती आखली होती; मात्र केंद्रीय अर्थसंकल्प मांडला गेला असता भाजपच्या शिडातून हवा गेली. आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिकेचाच कारभार अव्वल असल्याचे केंद्र सरकारनेही कबूल केल्याचे उद्धव यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव यांच्या प्रत्येक भाषणात याच मुद्द्याचा प्रभावीपणे वापर केला जाणार असल्याचे संकेत आहेत. पारदर्शकतेच्या मुद्द्याची चिरफाड केल्यानंतर उद्धव यांनी शेलक्‍या शब्दांत भाजपला टार्गेट केले. किरकोळ विषयावर कॉंग्रेसवरही त्यांनी टीका केली; मात्र संपूर्ण भाषणाचा रोख भाजप विरोधी होता. 

स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात मनसेनेही उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्याकडे युतीचा प्रस्ताव दिला होता; मात्र यावर काहीही निर्णय न घेता उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवाजी मंदिर येथील मेळाव्यात शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात मनसे आणि राज यांच्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून मनसेची होणारी पिछेहाट लक्षात घेता, त्यांची दखल घेण्याची काहीही गरज नसल्याचा संदेश उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेतून दिला.

Web Title: Uddhav Thackeray and Raj Thackeray differences continues