
Uddhav Thackeray : बावनकुळे नावाप्रमाणे किमान ५२ तरी जागा द्या; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
मालेगाव - शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी याआधी कोकणातील खेड येथे जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आज उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात सभा होत आहे. या सभेत उद्धव यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. उद्धव म्हणाले, की काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मनावर दगड ठेवून आपण सत्तास्थापन केली आहे. अर्थात शिंदे गटाला ते दगड म्हणाले होते.

बावनकुळे म्हणाले होते की, शिंदे गटाला आपण ४८ जागा देणार आहोत, आपल्याला भरपूर स्कोप आहे. यावर उद्धव म्हणाले की, अहो बावनकुळे तुमच्या नावाप्रमाणे मिंधे गटाला किमान ५२ तरी जागा द्या. तसेच शिवसेना संपली, असं बावनकुळे म्हणतात. पण लक्षात ठेवा, तुमची १५२ कुळं आली तरी शिवसेना संपणार नाही, असा इशाराही उद्धव यांनी दिला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर जोरदार हल्ला केला. ठाकरे म्हणाले की, तुम्हाला वाटत असेल कांद्याला बाजार मिळाला नाही. भाव मिळाला नाही, पण मी तसं म्हणत नाही. कांद्याला भाव मिळाला, कांद्याला किंती खोके भाव मिळाला, अशा शब्दात उद्धव यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर टीका केली. यावेळी ठाकरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्दावरून शिंदे सरकरावर जोरदार टीका केली.