मोदींनी मुंबईत यावेच - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

"टेकू' काढण्याचा संकेत 
भाजपच्या पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरही उद्धव यांनी हल्ला चढवला. विधानसभेत शिवसेनेचा टेकू घेण्यापूर्वी बहुमत सिद्ध करताना कोणाचा पाठिंबा घेतला होता, हे पारदर्शकपणे सांगा, असे आव्हान देत राज्यात सरकार चालवताना त्यांना शिवसेनेचा टेकू लागतो, तरी मुंबई महापालिका गिळायला का निघालात, असा सवाल उद्धव यांनी केला. शिवसेना कधीही राज्य सरकारचा टेकू काढू शकते, असेच त्यांनी यातून सूचित केले. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत सभेसाठी यावेच. त्यांच्या सभेनंतरही शिवसेना कशी जिंकते, हे दाखवून द्यायचे आहे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदींना देत भाजपला पुन्हा डिवचले. 

अधिवेशनात एक आणि नागरिकांसमोर दुसरेच बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग दाखल करायला हवा, अशा परखड शब्दांत त्यांनी भाजपवर तोफ डागली. चांदिवली येथे सोमवारी झालेल्या सभेत उद्धव यांनी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांचा समाचार घेतला. बिहार निवडणुकीच्या प्रचारात लिलाव करावा त्या प्रकारे निधीची घोषणा केली जाते, तरी त्यांचा सुपडा साफ झाला. कल्याण- डोंबिवलीत सहा हजार कोटी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यातील एक रुपया तरी दिला का, असा सवाल करत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. भाजपने 27 गावांची फसवणूक केली आहे. कोणाची औकात कोणाला दाखवायची, हे शिवसैनिकच ठरवतील, अशा शब्दांत त्यांनी भाजपला आव्हान दिले. प्रचाराच्या वेळी येणारे नेते कोण आणि संकटात धावून येणारे कोण हे मतदारांना माहीत आहे. माझा जन्म मुंबईतच झाला, त्यामुळे मुंबईच्या वेदना मला माहीत आहेत, असे सांगत 23 फेब्रुवारीला भाजपला दाखवूनच देऊ, असे खुले आव्हान उद्धव यांनी दिले. 

मुंबईला एक लाख कोटींचे प्रकल्प दिल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. उपकार केलेत का? अशा शब्दांत उद्धव यांनी मोदींच्या घोषणांची खिल्ली उडवली. 227 पैकी 114 जागा मागणारे हे नागोबा आहेत की अजगर, असा चिमटाही त्यांनी काढला. 

"टेकू' काढण्याचा संकेत 
भाजपच्या पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरही उद्धव यांनी हल्ला चढवला. विधानसभेत शिवसेनेचा टेकू घेण्यापूर्वी बहुमत सिद्ध करताना कोणाचा पाठिंबा घेतला होता, हे पारदर्शकपणे सांगा, असे आव्हान देत राज्यात सरकार चालवताना त्यांना शिवसेनेचा टेकू लागतो, तरी मुंबई महापालिका गिळायला का निघालात, असा सवाल उद्धव यांनी केला. शिवसेना कधीही राज्य सरकारचा टेकू काढू शकते, असेच त्यांनी यातून सूचित केले. 

Web Title: Uddhav Thackeray challenge to Narendra Modi